भारतात दोन करोना प्रतिबंधक लसींना मर्यादीत आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. यात सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे. भारतात सर्व भागांमध्ये लस पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या वाहतूक ताफ्यातील विमानांचा वापर करण्यात येणार आहे. यात C-130J आणि AN-32 सारखी मोठी विमाने लसी पोहोचवण्यासाठी वापरण्यात येणार आहेत.

लस उत्पादकांनी विशेष कंटेनर्सची व्यवस्था केली आहे. वाहतुकी दरम्यान लसी अपेक्षित तापमानात स्टोअर करण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने इंडिया टुडेला ही माहिती दिली. अरुणाचल प्रदेश, लडाख सारख्या दुर्गम भागांमध्ये लसी पोहोचवण्यासाठी इंडियन एअर फोर्स आपल्या ताफ्यातील मालवाहतूक विमानांचा वापर करणार आहे.

आणखी वाचा- लसीकरण १०० टक्के सुरक्षेची हमी देत नाही, मास्क वापरणं आवश्यकच – तज्ज्ञांचा सल्ला

हवाई मार्गे लस पोहोचवण्यासाठी मोठया प्रमाणात व्यावसायिक विमानांचा केला जाईल. एअर फोर्स या व्यावसायिक विमानांना लष्करी धावपट्ट्यांचा वापर करण्याची परवानगी देईल. सहसा व्यावसायिक विमाने लष्करी धावपट्ट्यांचा वापर करत नाही. देशातील दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी एअर फोर्सच्या विमानांचा वापर केला जाईल. योजनेनुसार, गरज पडली तर लस पोहोचवण्यासाठी एअरफोर्स आपल्या हेलिकॉप्टर्सचा सुद्धा वापर करेल. लस वाहतुकी संदर्भात अजून चर्चा सुरु आहे. लवकरच या बद्दल अतिम रुपरेषा ठरवली जाईल असे अधिकाऱ्याने सांगितले.