अफगाणिस्तानातून येत्या काही दिवसांत नाटो फौजा माघारी परतणार असल्यामुळे, भारतात दहशतवादी कारवायांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमधून नाटो फौजांच्या निघून जाण्यामुळे भारतात घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढू शकते, असा अहवाल इंटेलिजन्स ब्युरो(आयबी) या गुप्तचर संस्थेने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर सादर केला. देशविरोधी आंदोलने आणि कारवायांसाठी पैसा पुरविणाऱ्या आठ स्वयंसेवी संस्थांची यादीसुद्धा आयबीने आपल्या अहवालात सादर केली. आयबीचे प्रमुख आसिफ इब्राहिम यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना सादर केलेल्या या अहवालात आगामी काळात देशातील सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. नजीकच्या काळात अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांचे केंद्र भारत-पाक सीमारेषेजवळ स्थलांतरित होण्याची शक्यतासुद्धा या अहवालात वर्तविण्यात आली. तसेच भारताच्या आर्थिक विकासाला खीळ घालण्याचे प्रयत्नसुद्धा दहशतवाद्यांकडून केले जाऊ शकतात असा इशारा आयबीतर्फे देण्यात आला. तामिळनाडूतील कुदनकुलम अणुप्रकल्पाला अचानक निर्माण झालेल्या विरोधामागे दहशतवादी कारवायांचा हात असण्याची शक्यता आयबीने आपल्या वर्तविली आहे.