मेरठ येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या मुस्लिमांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देणारे पोलीस अधीक्षक अखिलेश नारायण सिंह यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. जर ही बाब खरी असेल तर हे निषेधार्ह असून त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे.

नक्वी म्हणाले, कोणत्याही स्तरावरील हिंसाचार मग तो पोलिसांकडून होत असेल किंवा जमावाकडून स्विकारार्ह नाही. लोकशाही देशात हे खपवून घेतले जाणार नाही. जे निरपराध आहेत त्यांची फरपट होऊ नये याची पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे.

मेरठमध्ये ‘सीएए’विरोधात आंदोलन सुरु असताना कर्तव्यावर असलेल्या मेरठचे पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते स्थानिक मुस्लिम लोकांना सांगताना दिसत आहे की, “त्यांना सांगा देशात रहायची इच्छा नसेल तर पाकिस्तानात जा.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, “आम्हाला पाहून इथल्या काही मुलांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करीत पळून गेले. त्यामुळे भारताचा द्वेष करायचा असेल तर पाकिस्तानात निघून जा असं मी त्यांना म्हणालो,” असं सिंह यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले होते.

दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षाने कडाडून टीका केली आहे. काँग्रेसचे ज्य़ेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विट करुन पोलीस अधिकाऱ्याचं असं वागण धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. तर असदुद्दीन ओवेसी यांनी देखील यावर भाष्य केले आहे. “मी भारतातील मुस्लिमांना कट्टरवादी विचारांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पोलीस अधिकाऱ्याने माझी सर्व मेहनतीवर वायाला घालवली,” असे त्यांनी म्हटले होते.