‘माझी आणि भाजपची जवळीक असल्याचे लोक म्हणतात. मात्र, सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्याबद्दल माझ्या मनात वैरभाव नाही. आपण राहुल, प्रियंका त्याचप्रमाणे मनमोहन सिंग यांना भेटलो आहोत. योगासनांमुळे मोदी पंतप्रधान होत असतील तर राहुल गांधींनीही योगासने केली पाहिजेत, असे मत पतंजलीचे बाबा रामदेव यांनी केला आहे.
भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी आयोजित केलेल्या योग शिबिरानिमित्त बाबा रामदेव यांचे जालना शहरात आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. रामदेव म्हणाले, राहुल गांधींनी अमेठीमध्ये योग शिबीर घेतले तर तेथे मी जाईल. काँग्रेसच्या खासदारांनी योग शिबीर घेतले तर तिथेही जाईल. मात्र, राहुल गांधी पक्षातून काढतील अशी भिती त्यांच्या खासदारांना वाटत असल्याने ते शिबीरच घेत नाहीत, असा दावा त्यांनी केला.
नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपण गेल्यामुळे ते पंतप्रधान झाले. तसे रावसाहेब दानवेंनाही आपला पाठींबा असल्याने ते राज्याचे मुख्यमंत्री होतील काय? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर रामदेव म्हणाले, आपण जालना येथे योग शिबीरासाठी आलो आहोत, कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आलेलो नाही. त्यामुळे आपल्या आगमनामुळे दानवेंना फायदा होणार असेल तर त्यामुळे इतरांना का त्रास होत आहे.
रामदेव म्हणाले, दलित, मुस्लिम त्याचप्रमाणे हिंदूंमधील विशिष्ट जाती आपापले संघटन करीत असतील तर मी त्याला देशहिताच्या दृष्टीने अनुकूल मानत नाही. बांगलादेशातील नागरिकांची घुसखोरी त्याचप्रमाणे रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिक्षण, आरोग्य सेवा सर्वांसाठी समान असली पाहिजे. बाहेरच्या देशातून काळे धन फार कमी प्रमाणावर आणता आले आहे. ते काम कठीण असले तरी सरकार त्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागपूर येथील संत्री प्रक्रिया प्रकल्पानंतर येत्या दिवाळीत नेवासा येथे दुध प्रकल्प सुरू करण्याचा पतंजलीचा प्रयत्न असल्याचे रामदेव यांनी यावेळी सांगितले. पतंजलीच्या माध्यमातून एक लाख लोकांना आतापर्यंत रोजगार मिळाला असून एक कोटी शेतकरी पतंजलीशी जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.