करोनाचा वाढता प्रादुर्भावर पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परंतु या घोषणेनंतरही अनेकजण रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर तेलंगण सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. ” लॉकडाऊन दरम्यान नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ,” असा स्पष्ट इशारा तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. “मी नागरिकांना विनंती करतो की अशी वेळ येऊ देऊ नका,” असंही ते म्हणाले.

“अमेरिकेत लॉकडाऊनसाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं. जर लोकांनी लॉकडाऊन पाळला नाही आणि जर गरज भासली तर राज्यात संचारबंदी लावण्यात येईल. तसंच हा आदेश न पाळणाऱ्यांना पाहताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील,” असा कठोर इशारा चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. अशी परिस्थिती येऊ देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

“राज्यातील नागरिकांनी कुठेही बाहेर जाऊ नये. काही अडचण असल्यास १०० हा क्रमांक डायल करावा. पोलीस संबंधितांच्या घरी मदतीसाठी येतील. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं. जर कोणी हे आदेश पाळले नाहीत तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश द्यावे लागतील,” असंही ते म्हणाले. “जे लोक परदेशातून परतले आहेत आणि ज्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं आहे, परंतु जे झाले नाहीत, त्यांचे पासपोर्ट जप्त करा. ज्यांना करोनाची लागण झाली आहे आणि ज्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितलं आहे त्यांच्यावर सरकार नजर ठेवून आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.