तेलगू देसम पक्षाने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याबद्दल मोदी सरकारविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव लोकसभेत पडला. ३२५ खासदारांच्या पाठींब्यावर मोदी सरकारने आश्वासकरित्या बाजी मारली. मात्र काल जवळपास १२ तास चाललेल्या चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर केलेली टीका आणि त्यानंतर मोदींना मारलेली मिठी याची चर्चा जास्त रंगताना दिसली. सोशल मीडियावरही राहुल गांधींची ही जादु की झप्पी चांगलीच गांजली. मात्र केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी आपल्या फेसबूक पेजच्या माध्यमातून राहुल गांधीच्या भाषणावर खोचक टीका केली आहे.

अवश्य वाचा – आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत, चंद्राबाबूंचा मोदींना टोला

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत राफेल विमान कराराबद्दल झालेल्या चर्चेचा तपशील सभागृहात कथन करत, स्वतःची विश्वासार्हता कमी करुन घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणाने जगासमोर भारतीय राजकारण्यांची चुकीची प्रतिमा तयार झाल्याचा आरोपही जेटलींनी आपल्या फेसबूक पोस्टमधून केला आहे. आपल्या भाषणात राहुल गांधीनी राफेल करार, बेरोजगारी, दलितांवर होणारा अत्याचार, कथित गोरक्षकांकडून होणारी जाळपोळ व हिंसा यासारख्या प्रश्नांवरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

“दुर्दैवाने राहुल गांधीनी संसदेसमोर चांगलं भाषण करण्याची संधी गमावली आहे. जर २०१९ साली होणाऱ्या निवडणुकीसाठी राहुल गांधीच्या मते हा सर्वोत्तम पवित्रा असल्यास, यापुढे देवच काँग्रेसचं भलं करु शकतो.” अशा खोचक शब्दांत जेटलींनी राहुल गांधींना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. दरम्यान सभागृहात राहुल गांधींनी राफेल कराराबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजप खासदारांनी चांगलाच गोंधळ घालत राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. मात्र राहुल यांनीही, आपण केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम आहोत असं म्हणत भाजप खासदारांना दाद लागू दिली नाही. त्यामुळे जेटलींच्या या टीकेला काँग्रेसकडून कोण उत्तर देतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.