29 September 2020

News Flash

खरगपूर आयआयटी तंत्रज्ञांकडून शेती दत्तक

आयआयटी खरगपूर येथे संशोधकांच्या एका गटाने नवीन कृषी तंत्रज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी शेतीचे रूपांतर प्रयोगशाळेत केले आहे.

| April 23, 2015 02:17 am

आयआयटी खरगपूर येथे संशोधकांच्या एका गटाने नवीन कृषी तंत्रज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी शेतीचे रूपांतर प्रयोगशाळेत केले आहे. काही शेतकऱ्यांची जमीन त्यांनी उत्पादनवाढीसाठी दत्तक घेतली आहे. आयआयटीपासून १० किमी अंतरावर असलेल्या खेंतिया खेडय़ातील १४ एकर जमीन या संशोधकांनी दत्तक घेतली आहे. ही तुकडय़ा तुकडय़ांची जमीन असून तेथे गेल्या काही वर्षांपासून काही पिकत नाही. शेतकऱ्यांनी डोळ्यात मोठी आशा बाळगून आपल्या जमिनी आयआयटीला दत्तक दिल्या. गेल्या नोव्हेंबरमध्ये नांगरट झाली, जमीन सपाट करण्यात आली, प्लॉट पाडण्यात आले.
आता आम्ही भाताचे उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रज्ञान वापरणार आहोत. कमी पाण्यात भाताचे पीक घेतले जाईल. मधुमका, भुईमूग, सोयाबीन यासारखी पिके घेतली जातील, असे प्रा. पी.बी.एस. भडोरिया यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देताना त्यांनी गांडूळखताचे प्रकल्पही राबवले आहेत. आयआयटीच्या तज्ज्ञांनी एक कूपनलिका खोदली असून पावसाचे पाणी साठवण्यासाठी तळे बनवले आहे. मत्स्यशेतीचा प्रयोगही ते करणार आहेत. ४८ वर्षांचे जगन्नाथ दास यांची थोडी जमीन आहे; त्यांनी सांगितले की आता आम्ही पिकांबाबत नवीन काही शिकतो आहोत. आम्ही आयआयटीच्या लोकांवर विश्वास ठेवत असल्याने त्यांना जमीन दत्तक दिली व आता नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. आमची शेते हाच एक वर्ग झाला आहे. तरूण अभियंता अभिषेक सिंघानिया यांनी धातूशास्त्राचे शिक्षण मद्रास आयआयटीमधून घेतले आहे. ते प्राइसवॉटरहाऊस कूपर्स या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी काम करतात. पण त्यांनी सौदी अरेबियातील नोकरी सोडून भारतात हरित क्रांती करण्यासाठी ते परत आले. आपल्या शेतकऱ्यांची वाईट अवस्था बघून त्यांना मदत करण्याचे ठरवले असे ते सांगतात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी योग्य लोक हवे आहेत. शेती ते विपणन या सर्व टप्प्यांत आपण त्यांना मदत करणार आहोत, त्यासाठी एक प्रारूप बनवले जाईल असे त्यांनी सांगितले,
प्रकल्प अधिकारी व कृषी तंत्रज्ञ तनूमय बेरा यांनी सांगितले की, शाश्वत तंत्रज्ञान वापरून पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होईल अशा पद्धतीने काम केले पाहिजे. सिस्टीम ऑफ राइस इंटेन्सिफिकेशनला पाणी व कीडनाशके ३०-४० टक्के कमी लागतात. आता या प्रकल्पामुळे आजूबाजूचे शेतकरीही नोंदी घेऊन आयआयटीकडे येत आहेत व त्या मॉडेलप्रमाणे आमच्या शेतीतही प्रयोग करायला शिकवा असे सांगू लागले आहेत. खेंतिया खेडय़ातील प्रकल्प तीन वर्षांचा असून उन्नत भारत अभियानातील ते पहिले आदर्श ग्राम ठरणार आहे. नंतरच्या टप्प्यात संवेदकांवर आधारित पाटबंधारे व ठिबक सिंचन, तुषार सिंचन, माती परीक्षण पद्धती वापरल्या जाणार आहेत, असे भडोरिया यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 2:17 am

Web Title: iit kharagpur researchers turn farmers to revolutionise agriculture
Next Stories
1 जे.बी. पटनाईक यांना अखेरचा निरोप
2 मुंबई हल्ला हा उच्चतंत्राधारित टेहळणी यंत्रणेच्या अपयशाचा परिपाक
3 सौदी अरेबियाचे येमेनमधील हवाई हल्ले बंद
Just Now!
X