आयएमएकडून चिंता व्यक्त

नवी दिल्ली : देशात क रोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना संसर्ग असलेल्या व्यक्तींची माहिती दैनंदिन पातळीवर जाहीर करण्यामुळे घबराट वाढण्यात भर पडत असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केले आहे.

सरकारने संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या  माहितीचे वर्गीकरण करण्याची आवश्यकता असून वैद्यकीय अचूकता त्यात असली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त  करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांच्या भागात काम करताना विश्वासार्ह माहितीच देणे गरजेचे असून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे, असे सांगून आयएमएने म्हटले आहे,की चीनमध्ये वरून खाली या पद्धतीने प्रतिसाद देण्यात आला. त्यामुळे गुंतागुंत वाढली होती हे नाकारता येणार नाही. भारतात १.३ अब्ज लोकसंख्या असताना सरकारने अंगीकारलेला समतोल दृष्टिकोन योग्यच आहे.

राज्यांमधील आरोग्य संस्था ताण सहन करण्यास सक्षम असल्या तरी त्यांना सतर्क रहावे लागणार आहे. यात संसर्गित व्यक्ती कुणाच्या संपर्कात आली ही शोधणे फार महत्त्वाचे असते. साबण व पाण्याने हात धुणे महत्त्वाचे असून ज्या लोकांना करोनाची लागण झाल्याचे निश्चित नाही त्याबाबत माहिती ऑनलाईन टाकली जाऊ नये. नकारात्मक संदेशांनी फार नुकसान होते. ज्यांना ताप व कफ असेल त्यांनी स्व विलगीकरणाचे तत्त्व अंगीकारावे.

करोनाबाबत २४ तास हेल्पलाईन इंग्रजी आणि हिंदी भाषेतून सुरू करण्यात येणार आहे. सरकारने या निमित्ताने सीओव्हीआयडी १९ चे रुग्ण शोधताना क्षयाचे रुग्णही शोधावेत.