करोनाविरोधातील लढा कायम ठेवतानाच आर्थिक आघाडीवरही पूर्ण ताकदीनिशी पुढे गेले पाहिजे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा बैठकीत दिला.

टाळेबंदीचा मोठा फायदा झालेला असून जगानेही त्याचे कौतुक केले. पण, आता आपल्याला छोटय़ा छोटय़ा प्रतिबंधात्मक विभागांवरच भर दिला पाहिजे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल व आर्थिक घडामोडीही सुरू ठेवता येतील. एक-दोन दिवसांची स्थानिक स्तरावरील टाळेबंदी किती प्रभावी ठरेल हे प्रत्येक राज्याने परिस्थिती पाहून ठरवावे. टाळेबंदी लागू केल्यामुळे आर्थिक घडामोडी सुरू होण्यात अडचण येत आहे का हेही पाहिले पाहिजे. प्रत्येक राज्याने गांभीर्याने विचार करूनच टाळेबंदी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना मोदी यांनी केली.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली आणि पंजाब या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. या राज्यामध्ये देशातील ६३ टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात ७०० हून अधिक जिल्हे आहेत पण, करोनाची चिंताजनक परिस्थिती सात राज्यांमधील फक्त ६० जिल्ह्यांमध्ये आहे. आपण या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले तर करोनाचा प्रादुर्भाव रोखता येऊ  शकेल. ७ दिवसांचा कार्यक्रम आखून दररोज एक तास त्या जिल्ह्यांतील तालुक्यांशी, तिथल्या प्रशासनाशी थेट संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी माहिती घ्यावी. भारतात करोनाचा संसर्ग वाढू लागला असल्याने नव्या प्रयोगांची गरज निर्माण झाली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी तालुकास्तरावर थेट संपर्क साधला पाहिजे, असा सल्ला मोदींनी दिला.

राज्य आपत्ती प्रतिसाद फंडाच्या वापरावरही महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. अनेक राज्यांनी मागणी केली होती की या फंडाच्या वापराची मर्यादा वाढवली जावी. त्यानुसार ही मर्यादा ३५ टक्कय़ांवरून ५० टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांना करोनाविरोधातील लढय़ासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होऊ  शकेल, अशी माहिती मोदींनी दिली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन तसेच आरोग्य मंत्रालयातील अधिकारीही सहभागी झाले होते.

विषाणूप्रसार रोखण्यासाठी पंचसूत्रीवर भर

*  प्रभावी चाचण्या, शोधमोहीम, देखरेख, तातडीने उपचार आणि स्पष्ट संदेश या पाच गोष्टींवर भर दिला पाहिजे. लोकांपर्यंत करोनासंदर्भातील सूचना प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत. कारण विनालक्षण व्यक्तींकडून संसर्ग होत असल्याचे दिसते. त्यातून अफवा पसरतात. हे टाळले पाहिजे. अनेकदा लोक करोनाच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

*  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मुखकवच. हे वापरण्याची सवय लावून घेणे अवघड आहे पण, दररोजच्या जगण्यात त्याचा वापर करावा लागणार आहे. त्याशिवाय आपण करोनाविरोधात नेमकेपणाने लढू शकणार नाही.

*  एका राज्यातून दुसऱ्या राज्यांतील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तर त्याचा लोकांना त्रास सहन करावा लागतो. ऑक्सिजनचा तुडवडा नाही. पण, तो पुरेशा प्रमाणात प्रत्येक राज्यांना मिळण्यासाठी राज्या-राज्यांमध्ये ताळमेळ असला पाहिजे. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरच्या दळणवळणात अडचण येणार नाही.