राजदचा माजी खासदार महंमद शहाबुद्दीन याच्यासह तीन जणांना बिहारमधील सिवान जिल्ह्य़ात अकरा वर्षांपूर्वी दोन भावांचा खून केल्याच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.

अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अजय कुमार श्रीवास्तव यांनी शहाबुद्दीन व त्याचे तीन साथीदार राजकुमार साह, शेख अस्लम व अरिफ हुसेन यांना २००४ मधील या प्रकरणात जन्मठेप सुनावली. शहाबुद्दीन याला २० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
फिर्यादी पक्षाने सांगितले की, चंद्रशेखर प्रसाद यांच्या तीन मुलांचे त्यांच्या गोशाला रस्त्यावरील घरातून अपहरण करण्यात आले. त्यात राजकुमार साह, शेख अस्लम व अरिफ हुसेन यांचा हात होता व हे प्रकरण १६ ऑगस्ट २००४ रोजी घडले. तीन भावांना प्रतापपूर येथे नेण्यात आले. त्यात गिरीश व सतीश या दोन भावांना अ‍ॅसिड टाकून ठार करण्यात आले तर राजीव रोशन हा तिसरा मुलगा सुटका करून घेण्यात यशस्वी ठरला होता. दोन भावांचे मृतदेह सापडले नाहीत. त्यांची आई कलावतीदेवी हिने शहाबुद्दीन व त्याच्या तीन गुंडांविरोधात मुलांचा खून केल्याप्रकरणी तक्रार केली होती.