भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत होणाऱ्या प्रस्तावित चर्चेचा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २१) रद्द केला. यावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भडकले असून त्यांनी ट्विटरवरुन भारताच्या या निर्णयाला उत्तर दिले आहे. भारताची ही भुमिका अहंकारी आणि नकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाव न घेता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत त्यांना कोत्या मानाचे म्हटले आहे.

ट्विटमध्ये इम्रान म्हणाले, शांतता चर्चा सुरु करण्यासाठी भारताने अहंकारी स्वरुपात नकारात्मक उत्तर दिले आहे. माझ्या जीवनात मी अनेक छोट्या लोकांना मोठ्या पदांवर जाताना पाहिले आहे. त्यांच्यामध्ये दूरदृष्टीचा अभाव असतो, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी शुक्रवारी म्हटले होते की, पाकिस्तानस्थित संघटनांद्वारे जम्मू आणि काश्मीरमध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांच्या अत्यंत क्रूरपणे हत्या केल्या होत्या. तर दुसरीकडे पाकिस्तानने दहशतवाद्यांचे समर्थन करणारी २० टपाल तिकीटे प्रकाशित केली. यावरुन पाकिस्तान आपला मार्ग कधीही बदलणार नाही हे स्पष्ट होते. त्यामुळेच चर्चेपूर्वीच पाकच्या सैतानी भुमिकेचा पर्दाफाश झाला आहे. त्याचबरोबर पाकस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहराही जगासमोर आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या चर्चेला अर्थ नाही.

पाकिस्तानने हिज्बुल मुजाहिद्दीनचा नेता बुरहान वानी यांच्या स्मरणार्थ नुकतेच एक टपाल तिकीट प्रकाशित केलं आहे. वानीला जुलै २०१६ मध्ये भारतीय सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातले होते. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठी आंदोलने झाली होती.