श्रीशांतच्या त्या फिक्स षटकामध्ये सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चंद्रेश पटेल नावाच्या बुकींने तब्बल अडीच कोटी रुपयांचा फायदा कमाविल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आलीये. नऊ मे रोजी झालेल्या सामन्यात श्रीशांतने आपल्या गोलंदाजीतील दुसरे षटक आधीपासूनच फिक्स केले होते. या षटकामध्ये त्याने बुकींनी ठरवून दिलेल्या धावा देण्यासारखी गोलंदाजी करण्याचे निश्चित केले होते.
पटेल याने त्या षटकामध्ये अडीच कोटी रुपये मिळवल्याचे आम्हाला आढळून आले आहे. एका रात्रीत पटेल आणि त्याच्यासोबतचे इतर बुकी श्रीमंत झाले. त्याचा आमच्याकडे पुरावादेखील आहे, अशी माहिती दिल्लीचे पोलिस आय़ुक्त नीरजकुमार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला खास मुलाखतीत दिली.
स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून गेल्या आठवड्यात पोलिसांनी पटेलला अटक केली. मुंबईतील अंधेरी (पूर्व) भागात तो राहतो. त्याने राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासोबत स्पॉट फिक्सिंग केले होते. वास्तविक पटेल रिअल इस्टेटचा व्यवसाय करतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील रिअल इस्टेट क्षेत्रात त्याची गुंतवणूक आहे.
स्पॉट फिक्सिंगमध्ये आपल्यासोबत संघातील इतरही काही खेळाडू आहेत, याची श्रीशांतला माहिती नव्हती, अशी कबुली त्याने चौकशीवेळी दिल्याचे नीरजकुमार यांनी सांगितले. त्याला असे वाटत होते की आपण एकटेच आपला मित्र आणि बुकीचेच काम करणारा जिजू जनार्दनसोबत स्पॉट फिक्सिंग करतो आहोत. अंकित चव्हाण आणि अजित चंडिला हे देखील दुसऱया काही बुकींसोबत स्पॉट फिक्सिंग करताहेत, याची त्याला कल्पना नव्हती. अंकित चव्हाणला स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यात चंडिलानेच ओढले होते. त्यामुळेच १५ मे रोजी झालेल्या सामन्यात ज्यावेळी चव्हाणने आपल्या गोलंदाजीतील दुसरे षटक फिक्स केले होते. त्यावेळी त्याला देण्यात येणाऱया पैशातील ठराविक हिस्सा चंडिलाने बुकींकडे मागितला होता. मीच चव्हाणला तुमच्यापर्यंत आणले असल्यामुळे मला माझा वाटा मिळाला पाहिजे, अशी चंडिलाची मागणी होती, असे नीरजकुमार म्हणाले.
कुख्यात दाऊद इब्राहिम किंवा त्याचा हस्तक टायगर मेमन यांचा स्पॉट फिक्सिंगशी थेट संबंध असल्याची शक्यता नीरजकुमार यांनी फेटाळली. ते म्हणाले, सध्या तरी अंडरवर्ल्डमधील या गुंडांचा स्पॉट फिक्सिंगशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा आमच्याकडे नाही. मार्च महिन्यात आमचे अधिकारी ज्यावेळी अंडरवर्ल्डसाठी काम करणाऱया संभाव्य मध्यस्थांचे फोन कॉल्स टॅप करीत होते, त्यावेळी ही लोकं बुकींच्याही संपर्कात असल्याचे आढळले. त्यांच्या संभाषणातून आम्हाला या क्रिकेटपटूंची नावे समजली आणि मगच आम्ही पुढची कारवाई सुरू केली.