दिल्लीत काही दुकानदारांनी केलेल्या मारहाणीत ईशान्येकडील एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच बंगळुरूमध्येही तीन विद्यार्थ्यांना स्थानिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कन्नड भाषेत न बोलल्याने स्थानिकांनी ही मारहाण केली.
मणिपूर येथील तीन विद्यार्थी मंगळवारी रात्री येथील एका हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले होते. या वेळी सदर विद्यार्थी अत्यंत जोरात बोलत असल्याने हॉटेलातील अन्य स्थानिकांनी त्यांना हळू आवाजात बोलण्यास सांगितले. मात्र या विद्यार्थ्यांनी त्याला इंग्रजी भाषेत प्रत्युत्तर दिले. स्थानिकांना ती भाषा समजली नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना कन्नड भाषेत बोलण्यास सांगण्यात आले.
तुम्ही कर्नाटकमध्ये खाता, कर्नाटकमध्ये राहता, त्यामुळे कन्नड भाषेतच तुम्हाला बोलावे लागेल, तुम्ही कन्नड भाषेत बोला, अन्यथा या राज्यातून चालते व्हा, असे या विद्यार्थ्यांना फर्मावण्यात आले आणि त्यानंतर स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात मायकेल नावाचा विद्यार्थी जखमी झाला. स्थानिकांनी हल्ला चढविल्याने आम्हाला बचाव करावा लागला आणि त्यामध्ये आपल्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली, असे मायकेल याने सांगितले.
हल्ला करणाऱ्या तीन स्थानिकांना मंगळवारी रात्रीच अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पोलीस अधिकारी विकासकुमार यांनी सांगितले.