मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरशीचा सामना सुरु आहे. दोन्ही पक्षांमध्ये फक्त काही जागांचे अंतर आहे. काँग्रेसकडे आता आघाडी असली तरी काँग्रेसचेच सरकार इथे बनेल असे अजूनही ठामपणे म्हणण्यासारखी स्थिती नाही. काँग्रेस इथे सर्वात मोठा पक्ष ठरला तर पक्षासमोर मुख्यमंत्री निवडीचा पेच निर्माण होऊ शकतो.

मध्य प्रदेशात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंदिया आणि दिग्विजय सिंह या तिघांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात आल्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची निवड करणे काँग्रेस अध्यक्षांसाठी सोपे नसेल. सध्या ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि राहुल गांधींचे तरुण सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

मध्य प्रदेशात काँग्रेसच सरकार बनवेल असा विश्वास ज्योतिरादित्य सिंदिया यांनी व्यक्त केला असला तरी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर त्यांनी सावध पवित्रा घेतला. पुढचे मुख्यमंत्री कमलनाथ असे फलक लागले आहेत त्यावर प्रतिक्रिया विचारली असता पूर्ण निकाल हाती येऊं दे असे उत्तर त्यांनी दिले. कलमनाथ पक्षाचे जुने जाणते नेते असून त्यांना आमदारांचाही पाठिंबा आहे. कमलनाथ यांना माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा सुद्धा पाठिंबा मिळू शकतो.