वाघा बॉर्डरवरील सुरक्षा यंत्रणा भेदून एका अनिवासी भारतीयाने रविवारी आपली एसयूव्ही गाडी थेट पाकिस्तानी प्रवेशद्वारापर्यंत नेल्यामुळे खळबळ उडाली. अगदी काही मिनिटांत झालेल्या या प्रकाराने वाघा बॉर्डरवरील सुरक्षारक्षक अवाक् झाले. पाकिस्तानच्या हद्दीतील प्रवेशद्वाराला धडकून कार थांबल्यानंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आणि त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कॅनडाचा रहिवासी असलेला सुरेंदर सिंग कांग असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
वाघा बॉर्डरचा परिसर अत्यंत सुरक्षित म्हणून ओळखला जातो. तिथे अशा पद्धतीने सुरक्षाकवच भेदून कार घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी होण्याची शक्यता आहे. सुरेंदर सिंग कांगला अटक करण्यात आली असून, त्याची स्कॉर्पिओ गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे. यासंदर्भात सीमा सुरक्षा दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एका अनिवासी भारतीयाने रविवारी आपली स्कॉर्पिओ गाडी वाघा बॉर्डरवरील स्वर्ण जयंती प्रवेशद्वार ओलांडून पाकिस्तानच्या दिशेने वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्तीकडे चौकशी केल्यानंतर त्याने स्वतःचे नाव सुरेंदर सिंग कांग असल्याचे सांगितले. १९९५ पासून तो कॅनडाचा कायमस्वरुपी रहिवासी असून, जालंधर पोलीस ठाणे हद्दीतील अधरमान गावात त्याचे घर आहे. दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी स्कॉर्पिओ गाडी वाघा बॉर्डरवरील पाकिस्तानी प्रवेशद्वाराला धडकल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.