भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना आपण खूप चांगली वागणूक दिली असा पाकिस्तानकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी नाही. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला.

भारतात परतल्यानंतर अभिनंदन वर्थमान यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानात आपला शारीरिक नव्हे तर प्रचंड मानसिक छळ करण्यात आला असे अभिनंदन यांनी सांगितले. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

बुधवारी भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पिटाळून लावताना झालेल्या हवाई संघर्षात विग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले व ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. अभिनंदन यांना शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास पाकिस्तानने भारताकडे सोपवले.

अभिनंदन यांच्या सुटकेला जवळपास तीन तास उशीर झाला. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांना सीमारेषा पार करण्यासाआधी जबरदस्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावला. त्यामुळे त्यांना तीन तास उशीर झाला. त्यातूनच पाकिस्तानी सैन्याची वाईट बाजू दिसते. अभिनंदन सध्या दिल्लीमध्ये असून कुलिंग डाऊन प्रोसेस अंतर्गत एअर फोर्सच्या सेंट्रल मेडिकल केंद्रात त्यांच्यावर सध्या वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. शनिवारी सकाळी अभिनंदन त्यांच्या कुटुंबियांना भेटले. एअर फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांची भेट घेतली.