राजस्थानात काँग्रेसने जबरदस्त पुनरागमन केले आहे. आत्तापर्यंत आलेले कल हे काँग्रेसच्या बाजूने आहेत. त्यामुळे भाजपाला इथे पुढील पाच वर्षे विरोधी पक्षात बसावे लागेल अशी स्थिती आहे. या निवडणुकीत भाजपाच्या पराभवाची अनेक कारणे आहेत. यामध्ये सगळ्यात मोठे कारण म्हणजे अनेक नेत्यांचे बंड. यावेळी मोठ्या संख्येने भाजपाशी बंडखोरी केली. काही जण तर आधीपासूनच भाजपावर नाराज होते. तर अनेकांनी तिकीट न मिळाल्यामुळे बंड पुकारले होते.

भाजपा आमदार घनशाम तिवारी हे वसुंधरा राजे यांच्याशी इतके नाराज होते की त्यांनी थेट भाजपातून बाहेर पडत आपला स्वतंत्र पक्षच स्थापन केला. भारत वाहिनी असे या पक्षाचे नाव असून याअंतर्गत त्यांनी ही निवडणूक लढवली. त्यांनी खुलेआम वसुंधरा राजेंचा विरोध केला होता. ते सांगानेरमधून ५ वेळा आमदार राहिले आहेत. तर गेल्यावेळी ते सुमारे ६० मताधिक्याने निवडून आले होते. तर दुसरे एक मोठे अपक्ष आमदार हनुमान बेनीवाल यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी स्थापन करुन ५७ जागांवर आपले उमेदवार दिले होते. राजस्थानात सर्वाधिक १२ टक्के व्होट बँक मानल्या जाणाऱ्या जाट समाजाचे ते नेते आहेत. त्यांचाच भाजपाचा खेळ बिघडवण्यात मोठा वाटा होता. त्याचबरोबर इतर बंडखोरांनीही भाजपाचा खेळ बिघडवला.

भाजपाने अनेक आमदार मंत्र्यांची तिकिटं कापली त्यामुळे ते भाजपावर नाराज होते. त्याचा परिणाम पक्षाला भोगावा लागला. तिकीट कापण्यापासून नाराज वसुंधरा राजे सरकार सरकारचे मंत्री सुरेंद्र गोयल यांनी जैतारनमधून, राजकुमार रिनवा यांनी रतनगडमधून, ओमप्रकाश हुडला यांनी महुवा आणि धनसिंह रावत यांनी बांसवाडा विधानसभेच्या जागांवरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत भाजपाला आव्हान दिले होते. आमदार अनिता कटारा, देवेंद्र कटारा, नवनीत लाल निनामा, किशनाराम नाई आणि गीता वर्मा हे देखील यंदा अपक्ष म्हणून लढले.