रुग्णालयात वीज उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टरांना बॅटरीच्या प्रकाशात एका महिलेवर शस्त्रक्रिया करावी लागली. बिहारच्या सहरसामधील सादर हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. डॉक्टर बॅटरीच्या उजेडात शस्त्रक्रिया करत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेमकी ही शस्त्रक्रिया कधी झाली ते समजू शकलेले नाही. या व्हिडिओमध्ये महिला बेशुद्ध अवस्थेत स्ट्रेचरवर झोपली आहे. खाकी रंगाचा शर्ट घातलेला डॉक्टर हातात कैची पकडून तिच्यावर शस्त्रक्रिया करत आहे. यावेळी शेजारी उभ्या असलेल्या महिलेने हातात बॅटरी पकडली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार रुग्णावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे रुग्णालयात वीज नसतानाही डॉक्टरने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. रुग्ण जखमी झाला होता. त्यामुळे टाके मारावे लागले. कुठलीही शस्त्रक्रिया झाली नाही. मी सिव्हील सर्जनकडे अहवाल मागितला आहे. अशा प्रकारच्या घटना कुठेही घडता कामा नयेत असे मंगल पांडे यांनी सांगितले.

वीज गेल्यानंतर बॅकअपसाठी असलेले जनरेटर चालू स्थितीत नव्हते असे अन्य वृत्तांमध्ये म्हटले आहे. देशात बॅटरीवर शस्त्रक्रिया करण्याची घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी एप्रिल २०१६ मध्ये उत्तर प्रदेशच्या माऊ जिल्ह्यात डॉक्टर मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात एका लहान मुलावर शस्त्रक्रिया करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. फेतहपूर येथील आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला होता.