X

उत्तर प्रदेशचा सर्वे मोदी-शाह जोडीची चिंता वाढवणारा, भाजपाला मिळू शकतात फक्त १८ जागा

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसू शकतो. जनमताच्या चाचणीतून ही बाब समोर आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसू शकतो. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सने केलेल्या जनमताच्या चाचणीतून ही बाब समोर आली आहे. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपा आणि त्यांचा घटक पक्ष अपना दलला फक्त १८ जागा मिळतील.

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या निकालाशी तुलना करता भाजपाचा ५३ जागांवर पराभव होऊ शकतो. असे घडले तर २०१९ मध्ये केंद्रातील सत्ता मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न भंग होऊ शकते. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची जी नवी आघाडी आकाराला आली आहे त्यामुळे भाजपाला इतका मोठा फटका बसणार असल्याचे सर्वेतून समोर आले आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सचा हा सर्वे मोदी-शाह जोडीची चिंता वाढवणार आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाने घवघवीत यश संपादन केले होते. भाजपाला तब्बल ७१ जागांवर विजय मिळाला. अपना दल-भाजपा आघाडीने ८० पैकी ७३ जागा जिंकल्या होत्या. देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो.

आज निवडणुका झाल्यास भाजपाला १८ तर सपा-बसपा आघाडीला ५८ जागांवर विजय मिळेल असा इंडिया टुडे आणि कार्वी इनसाइट्सच्या सर्वेचा अंदाज आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशात चार जागा जिंकेल असा सर्वेचा अंदाज आहे. कुठला पक्ष कुठली जागा लढवणार, उमेदवार आणि प्रत्यक्ष प्रचाराची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर काही प्रमाणात हे चित्र बदलू शकते.

First Published on: January 24, 2019 12:59 am