यूपीए सरकारने एक श्रेणी- एक निवृत्तिवेतन या निवृत्त लष्करी जवानांसाठीच्या योजनेकरिता निधी दिला होता, पण केंद्रातील मोदी सरकारने पुढे काहीच केले नाही, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे टीका केली. २०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका असून आम्हाला निवडून दिल्यास पश्चिम बंगालचे भाग्य बदलून टाकू, असे आश्वासन त्यांनी येथील जाहीर सभेत दिले.
अलीकडेच राहुल यांनी लष्करातील जवानांची भेट घेऊन एक श्रेणी- एक निवृत्तिवेतन हा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात हा प्रश्न सोडवण्यात येईल, त्यासाठी थोडा वेळ द्या, असे सांगितले होते.
दरम्यान माजी सैनिकांनी या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी सरकारला १५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. आमचे सरकार असताना ममता बॅनर्जी पंतप्रधानांच्या समवेत बांगलादेशला जायला राजी झाल्या नाहीत व आताच त्या मोदींबरोबर जाण्यास कशा तयार झाल्या, असा प्रश्न त्यांनी केला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपशी मैत्री केली आहे. एनडीएने आश्वासने पूर्ण केलेली नाहीत त्यावरून लक्ष उडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

हे श्रीमंतांचे सरकार
मोदी सरकारवर पुन्हा सुटाबुटाचे सरकार असा आरोप करून ते म्हणाले की, हे सरकार श्रीमंत लोकांसाठी आहे तर गरीब व शेतकरी यांच्या विरोधात आहे. जमीन अधिग्रहण विधेयकावर त्यांनी सांगितले की, उद्योगपतींना ही जमीन मिळणार आहे. त्यांना जमीन गुडगाव, नोईडा व कोलकात्यात हवी आहे. जेथे मालमत्तांच्या किमती जास्त आहेत तेथील जमीन त्यांना हवी आहे. डाव्यांवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. येथे डाव्यांची पक्ष संघटना होती. बाकी देश पुढे जात असताना त्यांनी पश्चिम बंगालची प्रगती रोखली, पण आता हातोडय़ापेक्षा फुलाचा प्रहार जास्त वाईट असतो असे लक्षात येत आहे. माकपच्या राजवटीत दडपशाही होती ती आता तृणमूलच्या राजवटीत वाढल्याचा आरोप केला. डाव्यांच्या राज्यात एक कोटी लोक बेरोजगार होते आताही तीच परिस्थिती आहे. ममतांनी उद्योग आणण्याचे आश्वासन दिले पण एकही उद्योग आला नाही असा आरोप केला.