Independence Day 2018 : भारताचा उद्या ७२ वा स्वातंत्र्यदिन आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी १५ ऑगस्ट ही तारीख इंग्रजांनी का निवडली हे तुम्हाला माहित आहे का? याचा कधी तुम्ही विचार केला का? तर जाणून घ्या हाच दिवस इंग्रजांनी का निवडला भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय क्रांतीकारकांच्या अतुलनीय त्यागानंतर व महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील देशभरातील अहिंसक चळवळीनंतर मेताकुटीला आलेल्या इंग्लंडला भारताला स्वातंत्र्य द्यावंच लागणार होतं. तसेच दुसऱ्या महायुद्धात जरी दोस्तांचा विजय झाला होता तरी इंग्रजांचं साम्राज्य खिळखिळं झालं होतं आणि भारताला स्वातंत्र्य द्यावं लागणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती, फक्त कधी हा प्रश्न होता.

ब्रिटनच्या संसदेने त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांना जून १९४८ पर्यंत भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्याचे आधिकार दिले होते. लॉर्ड माउंटबॅटन इंग्लंडशासित भारताचे शेवटचे आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. अशा लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट १९४७ ही भारताच्या स्वातंत्र्यासाठी निवडली.

काही इतिहासकांराच्या मते सी. राजगोपालाचारी यांच्या सुचनेनुसार लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या स्वातंत्र दिनाची तारिख १५ ऑगस्ट निवडली. ‘जून १९४८ पर्यंत आम्हाला पारतंत्र्यात ठेवण्यासाठी तुमच्याकडेच सत्ता राहणार नाही. तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सत्ता द्या’, असे त्यावेळी सी. राजगोपालाचारी यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना सुनावले होते. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनाची तारिख १५ ऑगस्ट निवडली.

काही इतिहासकारांच्या मते, १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचा लॉर्ड माउंटबॅटन यांचा वैयक्तिक निर्णय होता. सर्व काही माझ्या नियंत्रणात असल्याचे त्यांना दाखवायचे होते. त्याचप्रमाणे ते १५ ऑगस्ट ही तारीख शुभ मानत होते. त्यामुळे त्यांनी हा दिवस निवडला होता असेही मानण्यात येते. अवघ्या दोन वर्षांपूर्वी १९४५ च्या १५ ऑगस्टला दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या सैनिकांनी आत्मसमर्पण केले होते. त्यावेळी जपानच्या आघाडीवर लॉर्ड माउंटबॅटन दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचे कमांडर होते. दुसऱ्या महायुद्धाला अंतिम विजयी स्वरूप देण्यात जपानच्या पराभवाचा मोठा वाटा होता आणि हे १५ ऑगस्ट रोजी घडल्यामुळे असं सांगण्यात येतं की भारताला स्वातंत्र्य देण्याच्या शुभ कामासाठी माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्टची निवड केली असावी.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independence day 2018 history importance and significance of independence day
First published on: 14-08-2018 at 13:56 IST