स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत या योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबरपासून होणार असल्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे गरीबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळू शकेल, असा दावाही त्यांनी केला.

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. ८५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहितीदेखील दिली. या प्रसंगी मोदींनी आयुष्मान योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबरला होणार असल्याचे जाहीर केले. मोदी म्हणाले, आजारपणामुळे मध्यमवर्गातील चांगली आर्थिक स्थिती असलेले कुटुंबही हादरुन जाते. देशातील गरीब आणि सर्वसामान्यांना चांगले उपचार मिळावे. मोठ्या आजारांसाठी चांगल्या रुग्णालयात मोफत उपचार मिळावे, यासाठी आम्ही पंतप्रधान जनआरोग्य योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि उच्च उत्पन्न गटालाही या योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

योजनेत पारदर्शकता राहावी आणि सर्वसामान्यांना या योजनेचा सहज लाभ घेता यावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या तंत्रज्ञानाची सध्या चाचपणी सुरु आहे. २५ सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीला देशभरात या योजनेचा शुभारंभ होईल, असे त्यांनी जाहीर केले.  देशातील गरीब व्यक्तीला आता आजारपणासाठी सावकाराकडून पैसे घ्यावे लागणार नाही. नवीन रुग्णालये उभारले जातील आणि यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला.