Independence Day 2018: भारतात राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे आज देशातील लाखो बालकं निरोगी आयुष्य जगत आहेत. आपल्या या मोहिमेचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी देशात सत्याग्रही तयार केले. या सत्याग्रहींनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिले. आज महात्मा गांधींच्या प्रेरणेतून आम्ही स्वच्छाग्रही तयार केले आहेत. हे स्वच्छाग्रहीच देशाला स्वच्छ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून व्यक्त केले.

भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त देशाला ते संबोधित करत होते. स्वच्छता अभियानाला कमालीचे यश मिळाल्याचे सांगत या देशव्यापी अभियानातून स्वच्छाग्रही तयार झाल्याचे ते म्हणाले.

यावर्षी २५ सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान देशाला सर्मपित केले जाणार असून गरीब व्यक्तीलाही चांगली आणि परवडणारी आरोग्य सेवा या माध्यमातून मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आरोग्य क्षेत्रातील सरकारच्या या अभियानाचा देशातील ५० कोटी भारतीयांना फायदा होणार आहे. देशातल्या प्रत्येक गरीब व्यक्तीला परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशातील प्रामाणिक करदात्यांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे.