वॉशिंग्टन : अमेरिकेत प्रथमच शिखांची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून जनगणना होणार आहे. यंदा (२०२० साली) अमेरिकेत होणाऱ्या जनगणनेवेळी शीख धर्मीयांची स्वतंत्ररीत्या गणना करण्यात येणार असल्याची माहिती, येथील अल्पसंख्याक संघटनेने दिली.

सॅन डियागो येथील शीख संघटनेचे अध्यक्ष बलजित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख समुदायाची स्वतंत्ररीत्या जनगणना व्हावी यासाठी आम्ही बऱ्याच वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. अमेरिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत अनेकदा बैठका घेण्यात आल्या. त्याचे फळ आज मिळाले आहे. या निर्णयाचा केवळ शीख धर्मीयांनाच नव्हे, तर अमेरिकेतील सर्व अल्पसंख्याक समुदायांना पुढच्या काळात फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अमेरिकेत पहिल्यांदाच एखाद्या अल्पसंख्याक समुदायाची ‘स्वतंत्र जाती समूह’ म्हणून गणना होत असून, त्यांना विशिष्ट प्रकारचा संकेतांक (कोड) दिला जाणार आहे. या संकेतांकामुळे स्वतंत्ररीत्या गणना करताना अधिक पारदर्शकता आणि अचूकता राहील, अशी माहिती अमेरिकेतील जनगणना कार्यालयाचे उप-संचालक रॉन जर्मिन यांनी दिली.

शीख संघटनांच्या दाव्यानुसार, आजमितीस अमेरिकेतील शिखांची संख्या दहा लाख असून, जनगणनेनंतर त्यात निश्चितच वाढ झालेली दिसून येईल.