नवी दिल्ली : देशात मंगळवारी नवा लसविक्रम नोंदविण्यात आला. दिवसभरात देशात सव्वा कोटीहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. देशात मंगळवारी एक कोटी २५ लाखांहून अधिक नागरिकांना लसलाभ मिळाला. गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झाले. तसेच देशात आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या ६५ कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या आहेत.

देशातील ५० कोटी नागरिकांना लशीची किमान एक मात्रा मिळाली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी जाहीर केले. या कामगिरीबद्दल मंडाविया यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

देशात जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर दहा कोटी लसमात्रा देण्यासाठी ८५ दिवस लागले होते. मात्र, जूनअखेर लसीकरण मोहिमेला गती मिळाली असून, आता एकूण ६५ कोटी लसमात्रांचा टप्पा ओलांडण्यात आला आहे.

इंदूर, हिमाचलमध्ये सर्वाना किमान एक लसमात्रा

हिमाचल प्रदेशमध्ये सर्व लसपात्र नागरिकांना लशीची किमान एक मात्रा मिळाली आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिमाचलमधील नागरिकांशी ६ सप्टेंबरला संवाद साधणार आहेत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही सर्व नागरिकांना लशीची किमान एक मात्रा मिळाली आहे. किमान एका लसमात्रेचा लाभ मिळालेले इंदूर हे देशातील दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेले पहिले शहर असल्याचे इंदूरचे जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी सांगितले.