सर्व प्रलंबित प्रश्न आम्ही संवादाच्या माध्यमातून सोडवण्यास तयार आहोत असे सांगून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताबरोबरच्या शस्त्रसंधी कराराचे स्वागत केले आहे.

भारत व  पाकिस्तान यांनी गुरुवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी काटेकोरपणे पाळण्याचा करार केला होता. त्यावर पहिली प्रतिक्रिया देताना खान यांनी म्हटले आहे, की ‘‘दोन्ही देशातील संबंधात आणखी प्रगती करण्याची जबाबदारी भारतावर आहे. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी कायम करण्याच्या कराराचे त्यांनी स्वागत केले. पुढील प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची जबाबदारी भारताची आहे. काश्मिरी लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क देण्याची मागणी जुनी असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने केलेल्या ठरावानुसार त्यावर निर्णय घेण्यात यावा. पाकिस्तानने नेहमीच शांततेसाठी पुढाकार घेतला असून यापुढेही प्रलंबित प्रश्न संवादाने सोडवता येतील.’’

शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर भारत व पाकिस्तान यांनी संयुक्त निवेदन जारी केले. त्यानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीसह सर्व करारांचे कसोशीने पालन केले जाईल. दोन्ही देशांच्या लष्करी कामकाज महासंचालकांमध्ये  हॉटलाइनवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी हा निर्णय २४-२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्याचे ठरवले होते.

‘दहशतवादविरोधी मोहिमांवर परिणाम नाही’

उधमपूर : नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे काटेकोर पालन करण्याबाबत भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या कराराचा जम्मू- काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांवर काहीही परिणाम होणार नाही, असे लष्कराच्या उत्तर विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी शनिवारी सांगितले. जम्मू-काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले नॉदर्न कमांड हे अतिशय दक्ष राहिले असून, सीमेवरील बदलत्या परिस्थितीच्या पाश्र्वाभूमीवर जे अशक्य वाटत होते, ते आपल्या शौर्य, साहस व दृढनिश्चय या गुणांमुळे शक्य करून दाखवले, असे ते म्हणाले.

महासंचालकांनी (डीजीएमओ) २४-२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे पालन करण्याच्या कराराची घोषणा नुकतीच केली.