पाकिस्तानने त्याच्या कुरापती थांबवल्या नाहीत तर प्रसंगी आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भरला आहे. सीमेलगत पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे.

पाकने हे वर्तन थांबवले नाही तर सीमेवर दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराप्रमाणेच सीमा ओलांडूनही भारतीय जवान कारवाई करतील असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारताला पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करायचे आहेत. मात्र पाकिस्तानला इथे दहशतवादी कारवाया घडवण्यात आणि कुरापती काढण्यातच रस आहे त्यामुळे वेळ पडल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

राजनाथ सिंह रविवारी लखनऊमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. भारताची मान कोणत्याही परिस्थितीत खाली झुकू देणार नाही असेही सिंह यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश प्रगती करतो आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गती प्राप्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय अर्थ तज्ज्ञांनीही भारत प्रगतीपथावर असल्याचे मान्य केले आहे असेही सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानवर त्यांनी कडाडून टीका केली.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होते आहे. पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबारही केला जातो आहे. या गोळीबाराला भारतीय सैन्य जशास तसे उत्तर देते आहे. पाकिस्तानचे दहा रेंजर्स भारतीय सैन्याने नुकतेच ठार केले. मात्र गेल्या चार दिवसात भारताचे ६ जवान शहीद झाले आहेत. ही बाब चिड आणणारी आहे. त्यामुळे पाकिस्तानने तातडीने त्यांचे हल्ले थांबवावेत नाहीतर आम्ही पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना जशास तसे उत्तर देऊ असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

सीमावर्ती भागात लोकांचे पलायन
पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारामुळे सीमाभागातून लोक पलायन करत आहेत. सीमावर्ती भागातून आत्तापर्यंत ४० हजार लोकांनी त्यांचे गाव सोडल्याची माहिती समोर आली आहे असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.