नवी दिल्ली : पूर्व लडाख व सिक्कीममधील सीमेवर निर्माण झालेला वाद शांततामय मार्गाने मिटवण्यासाठी यापुढेही लष्करी व राजनैतिक चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार भारत व चीन यांनी  केला आहे. या चर्चामध्ये द्विपक्षीय करार व दोन्ही देशांच्या नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आधार घेतला जाणार आहे,असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत व चीन यांच्यात शनिवारी पूर्व लडाखमधील प्रश्नाबाबत लष्करी पातळीवर चर्चा करण्यात आली. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सची प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या हद्दीत असलेल्या माल्डो येथे प्रदीर्घ चर्चा झाली.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे,की सौहार्द व सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून दोन्ही देशातील संबंधात प्रगती साधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा प्रश्न सोडवताना दोन्ही देशांच्या नेत्यांचे मार्गदर्शन व द्विपक्षीय करार यांचा आधार घेतला जाणार आहे.दोन्ही देशातील संबंधात प्रगती होण्यासाठी सीमेवर शांतता व स्थिरता नांदण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना यावर्षी सत्तर वर्षे पूर्ण झाली असून आताच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघाला तर द्विपक्षीय संबंधात आणखी प्रगती होणार आहे. दोन्ही देशात लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा यापुढेही सुरू राहणार आहे. सीमेवर शांतता नांदण्यास दोन्ही देश वचनबद्ध आहेत. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लेह येथील १४ व्या कोअरचे अधिकारी लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले, तर चीनचे नेतृत्व तिबेट लष्करी जिल्ह्य़ाचे मेजर जनरल लिउ लिन यांनी केले. सीमेवर पूर्वी होती तशी शांततामय परिस्थिती निर्माण करावी तसेच चीनने अतिरिक्त सैन्य माघारी घ्यावे अशा मागण्या भारतीय शिष्टमंडळाने केल्याचे समजते. दोन्ही देशात दोन दिवसांपूर्वी राजनैतिक चर्चा झाली होती, त्यात शांततामय चर्चेतून मतभेद मिटवण्याचे मान्य करण्यात आले होते. भारत व चीन यांच्यातील सीमा ३४८८ कि.मी लांबीची असून अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनने केला आहे, जो भारताने फेटाळला आहे.