News Flash

भारताकडे मदतीचा ओघ; मात्र वितरणाबाबत प्रश्न

इटलीहून विशेष लष्करी विमानाने प्राणवायूनिर्मिती प्रकल्प आणि तज्ज्ञांचे पथकही आले आहे.

नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट आली असून त्याचा मुकाबला करण्यासाठी परदेशातून सातत्याने मदतीचा ओघ भारतात येत आहे, इटलीतून मोठा प्राणवायूनिर्मिती प्रकल्प, २० व्हेण्टिलेटर्स आणि तज्ज्ञांचे पथक आले असून सोमवारी ब्रिटनमधून ६० व्हेण्टिलेटर्सही आले आहेत, मात्र परदेशातून आलेल्या या मदतीच्या वाटपावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इटलीहून विशेष लष्करी विमानाने प्राणवायूनिर्मिती प्रकल्प आणि तज्ज्ञांचे पथकही आले आहे. संपूर्ण रुग्णालयाला पुरवठा करण्याची क्षमता असलेला हा प्राणवायूनिर्मिती प्रकल्प असून तो नोइडातील आयटीबीपी रुग्णालयात बसविण्यात आला आहे, असे इटालीच्या दूतावासातून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे इटलीतून २० व्हेण्टिलेटर्सही पाठविण्यात आले आहेत. फ्रान्सने रविवारी उच्च क्षमतेचे आठ प्रकल्प पाठविले आहेत तर जर्मनीकडून या आठवडय़ात प्रकल्प पाठविण्यात येणार आहेत.

ब्रिटनकडून वैद्यकीय मदतीचा चौथा साठा सोमवारी आला असून त्यामध्ये ६० व्हेण्टिलेटर्स, प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर्स आणि पीपीई किट यांचा समावेश आहे. कतारमधील भारतीय दूतावासानुसार, जगभरातून ३०० टन वैद्यकीय मदत कतार एअरवेजच्या वतीने भारतात मोफत आणली जात असून त्यामध्येही व्हेणिटलेटर्स, पीपीई किट आदींचा समावेश आहे. भारतीय युद्धनौका आयएनएस ऐरावतमधून सिंगापूर रेड क्रॉसच्या वतीने तीन क्रायोजेनिक प्राणवायू टँक आण जवळपास एक हजार प्राणवायू सिलिंडर्स पाठविण्यात येत आहेत, असे सिंगापूर उच्चायुक्तालयातून सांगण्यात आले.

अधिकृत आकडेवारीनुसार भारतात यापूर्वीच १६५६ प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर्स, ९६५ व्हेण्टिलेटर्स, १७८२ प्राणवायू सिलिंडर्स, १७ मोठे सिलिंडर्स, २० मोठे प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर्स, १५० मॉनिटर्स, २० प्राणवायू उपकरणे, नऊ प्राणवायूनिर्मिती प्रकल्प, एक लाख ३६ हजार रेमडेसिविरच्या मात्रा, फॅव्हिपिराविरची दोन लाख पाकिटे आणि अन्यपुरवठा करण्यात आला आहे. तथापि, ही उपकरणे आणि अन्य साहित्य यांच्या वितरणाबाबत अल्प तपशील उपलब्ध आहे. फ्रान्स आणि इटलीनेच पुरवठय़ाबाबतचा तपशील दिला आहे. त्यामुळे पुरवठय़ाच्या वितरणाबाबत समाजमाध्यमांसह विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मंत्र्याचा सक्षम गट आणि ज्येष्ठ अधिकारी राज्यांच्या गरजेनुसार वितरण करण्यास जबाबदार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे. परदेशातून भारतीय विमानतळावर साहित्य आले की ते इंडियन रेड क्रॉस सोसायटीकडे सुपूर्द केले जाते, ते सरकारच्या वतीने ही मदत स्वीकारतात, त्यानंतर रेड क्रॉस, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि एचएलएल लाइफकेअर यांच्याकडून मदत हाताळण्यात येते. तथापि, दिल्ली विमानतळावरील एचएलएलच्या गोदामातून किती साहित्य पाठविण्यात आले त्याबद्दल सुस्पष्टता नाही. वितरणातील पारदर्शकतेबद्दल अमेरिकेसारख्या देशातील माध्यमांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

विविध राज्यांना वितरण : आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : करोनाचा मुकाबला करण्यासाठी परदेशातून उपलब्ध झालेल्या मदतीचे विविध राज्यांना वितरण करण्यात आले असल्याचे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

मंत्रालयाने ठरविलेले निकष आणि तत्त्वे यानुसार प्रत्येक राज्याच्या गरजेनुसार २४ विविध वर्गवारीतील साहित्य विविध राज्यांमधील ८६ संस्थांकडे वितरित करण्यात आले आहे, असे मंत्रलयाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे. बीआयपीएपी यंत्रे, प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर्स, सिलिंडर्स, पीएसए प्राणवायू प्रकल्प, फॅव्हिपिराविर आणि रेमडेसिविर ही औषधे आणि पीपीई कीट या साहित्याचा मुख्यत्वे समावेश आहे.

मदत मर्यादित स्वरूपातील असल्याने ज्या राज्यांमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या अधिक आहे तेथे अधिक मदत देण्यात आली आहे. परदेशातील मदत एचएलएलकडून वितरित केली जाते, तर लष्कराच्या विमानतळावर मदत आल्यास लष्करी व्यवहार विभागामार्फत एचएलएलला मदत करण्यात येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 1:37 am

Web Title: india constantly receiving help from abroad after second wave of corona hit zws 70
Next Stories
1 ‘एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास पुन्हा करू नका!’ ICMR च्या नवीन मार्गदर्शक सूचना जारी!
2 भारत लवकरच 5G होणार; Jio, VI, Airtel करणार चाचण्या, चायनिज कंपन्यांना मात्र बंदी!
3 “पंतप्रधानजी तुम्ही माझ्या वडिलांच्या पाया पडायचांत; माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्या”
Just Now!
X