पाकिस्तान हा दहशतवाद पोसणारा आणि त्याला खतपाणी घालणारा देश असून त्या देशासमवेत लष्करी सहकार्य करण्यास भारताचा ठाम विरोध आहे, असे भारताने रशियाकडे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या सहकार्यामुळे समस्याच निर्माण होतील, असेही भारताने म्हटले आहे.

भारताचे मॉस्कोतील राजदूत पंकज सरण यांनी ‘रिया नोव्होस्ती’ या रशियातील वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये वरील बाब स्पष्ट केली आहे. रशियाने पाकिस्तानला लष्करी सहकार्य केल्यास त्यामुळे समस्याच निर्माण होतील हेही भारताने अधोरेखित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादमिर पुतिन यांची येत्या शनिवारी गोव्यात भेट होणार असून त्या पाश्र्वभूमीवर सरण यांनी वरील मत व्यक्त केले आहे. पुतिन १४ ऑक्टोबर रोजी भारतात येत आहेत. दोन देशांमधील शिखर परिषदेबरोबरच पुतिन १६ ऑक्टोबर रोजी ब्रिक्स बैठकीलाही हजर राहणार आहेत.

रशियाने पाकिस्तानसमवेत लष्करी कवायती करण्याचे ठरविल्याबद्दल भारताने नाराजी कळविली आहे. मात्र अशाच प्रकारच्या कवायती रशियाने प्रादेशिक पातळीवर अन्य देशांसमवेतही केल्या असल्याचे स्पष्ट करून रशियाने भारताचा विरोध सौम्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

जगापुढे सध्या अनेक ज्वलंत प्रश्न आहेत आणि त्याबाबत ब्रिक्स परिषदेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. या प्रश्नांमध्ये दहशतवाद आणि ब्रिक्स गटातील सर्व देशांना असलेला दहशतवादाचा धोका आदींचा समावेश आहे. जागतिक स्थिती आणि प्रादेशिक तिढा यावरही चर्चा केली जाणार आहे, असे सरण म्हणाले.

मोदी-पुतिन भेटीत संरक्षण, सुरक्षा, व्यापारावर चर्चा

पीटीआय, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शनिवारी भेट होणार असून त्या वेळी सुरक्षा, संरक्षण आणि व्यापार आदी क्षेत्रांतील सहकार्याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे.

येत्या १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान पुतिन गोवा भेटीवर येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. ब्रिक्स परिषदेला हजर राहण्याबरोबरच पुतिन १७ व्या भारत-रशिया शिखर परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या परिषदेनंतरच्या स्थितीचाही आढावा या वेळी घेण्यात येणार आहे.