सीमेवर तणाव असाच वाढत राहिला तर भारताला चीन, पाकिस्तान आणि नेपाळ या तिन्ही देशांकडून लष्करी दबावाचा सामना करावा लागेल असा इशारा ग्लोबल टाइम्समधल्या लेखातून देण्यात आला आहे. ग्लोबल टाइम्स हे चीनमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाल्यापासून सातत्याने ग्लोबल टाइम्समधून भारताला धमक्या, इशारे दिले जात आहेत.

शांघाय अ‍ॅकेडमी ऑफ सोशल सायन्समधील आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक हू झीहायाँग यांच्या विधानाचा संदर्भ लेखामध्ये देण्यात आला आहे. “भारताचा एकाचवेळी चीन, पाकिस्तान आणि नेपाळ बरोबर सीमावाद सुरु आहे. पाकिस्तान हा चीनचा विश्वासू रणनितीक सहकारी आहे. नेपाळ बरोबरही चीनचे घनिष्ठ संबंध आहेत. हे दोन्ही देश चीनच्या प्रस्तावित बॉर्डर अँड रोड प्रकल्पातील भागीदार आहेत. भारताने सीमावाद वाढवला तर त्यांना एकाचवेळी दोन किंवा आघाडयांवर दबावाचा सामना करावा लागेल. हे भारताच्या लष्करी क्षमतेपलीकडे असून त्यांचा मोठा पराभव होईल” असे हू झीहायाँग यांच्या हवाल्याने ग्लोबल टाइम्समधल्या लेखात म्हटले आहे.

“सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा चीनचा कुठलाही हेतू नाही. गलवान खोऱ्यात जी घटना घडली त्याला भारताच जबाबदार आहे” असे हू झीहायाँग यांनी ग्लोबल टाइम्सशी बोलताना सांगितले.

‘ओप्पो’ला रद्द करावा लागला फोनचा लाइव्ह लाँच इव्हेंट
चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंगसाठी आयोजित केलेला लाइव्ह इव्हेंट रद्द केला. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे कंपनीने नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँच न करता केवळ एक 20 मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन Oppo Find X2 फोन भारतात लाँच केल्याची घोषणा केली. लाइव्ह लाँचिंगऐवजी केवळ व्हिडिओ का अपलोड करण्यात आला याबाबत वृत्तसंस्था Reuters ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यावर ओप्पोकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

चीनला दणका; रेल्वे चिनी कंपनीला दिलेलं ५०० कोटींचं कंत्राट करणार रद्द

भारत आणि चीनदरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. लडाखमध्ये झालेल्या हिंसेत २० भारतीय जवान शहीद झाल्यामुळे आणि चीनच्या हेकेखोरीला उत्तर देण्यासाठी आता केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. चीनला आर्थिक दणका देण्याच्या उद्देशाने सरकारने योजना तयार केली आहे. त्यानुसारच भारतीय रेल्वेशी संबंधित कंत्राटे चिनी कंपन्यांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच यापूर्वी चिनी कंपन्यांना मिळालेल्या कंत्राटांवरही याचा परिणाम होण्याची चिन्ह दिसत आहेत. टेलिकम्युनिकेशन्श क्षेत्राशी संबंधित सरकारच्या मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएललाही नवीन प्रणाली बसवताना चिनी सामान न वापरण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलं आहे.