केंद्रातील तीन शेतकी कायद्यांचा निषेध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने किसान महापंचायतीची हाक दिल्यानंतर रविवारी मुझफ्फरनगरमध्ये उत्तर प्रदेश आणि शेजारील राज्यांतील हजारो शेतकऱ्यांनी उपस्थित राहत आपली ताकद दाखवली.

“भारत विकणे आहे, हेच सरकारचे धोरण आहे,” असं प्रतिपादन भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी महापंचायतीला संबोधित करताना केलं. “देशाची विक्री होण्यापासून रोखले पाहिजे. शेतकरी वाचला पाहिजे, देश वाचला पाहिजे; व्यवसाय, कर्मचारी आणि तरुण वाचले पाहिजेत-हे रॅलीचे उद्दिष्ट आहे. ” असंही टिकैत म्हणाले. त्यांनी पुढे ठामपणे सांगितले की, नऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेली शेतकरी चळवळ सरकारद्वारे तीन वादग्रस्त कायदे मागे घेतल्याशिवाय संपणार नाही. आगामी काळात देशभरात अशा आणखी महापंचायत बैठका घेण्यात येतील, असे त्यांनी जाहीर केले.

“आमचा संघर्ष नऊ महिन्यांपासून चालू आहे पण सरकारने संवाद साधणे बंद केले आहे. त्यांनी दिल्लीच्या बाहेरील भागात विरोधात बसलेल्या शेकडो शेतकऱ्यांसाठी एक मिनिटही मौन पाळले नाही. पण आम्ही थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार, असंही ते म्हणाले. बीकेयूचे मीडिया प्रभारी धर्मेंद्र मलिक म्हणाले की, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक यासारख्या विविध राज्यांमध्ये पसरलेल्या ३०० संघटनांचे शेतकरी या कार्यक्रमासाठी जमले आहेत. मुजफ्फरनगरमधील शहरातील रस्ते आणि उड्डाणपूल ठप्प होते कारण शेतकरी मोठ्या संख्येने महापंचायतीला उपस्थित होते. विविध संघटनांचे झेंडे घेऊन आणि वेगवेगळ्या रंगाच्या टोप्या परिधान केलेल्या महिलांसह शेतकरी बस, कार आणि ट्रॅक्टरमधून कार्यक्रमस्थळी पोहोचलेले दिसले.

केंद्राच्या तीन शेतकरी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या एसकेएमने सांगितले की, या आंदोलनाला सर्व जाती, धर्म, राज्य, वर्ग, लहान व्यापारी आणि समाजातील इतर घटकांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध होईल.
५ सप्टेंबरची महापंचायत योगी-मोदी सरकारला शेतकरी, शेतमजूर आणि शेतकर्‍यांच्या चळवळीच्या समर्थकांच्या शक्तीची जाणीव करून देईल. मुझफ्फरनगर महापंचायत गेल्या नऊ महिन्यांतील सर्वात मोठी असेल”, असंही एका निवेदनात म्हटलं आहे.