१९७१ सालच्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावलेले एक ऐतिहासिक ‘डाकोटा’ विमान भारताने बांगलादेशला सोमवारी समारंभपूर्वक हस्तांतरित केले.
आक्रमणकारी पाकिस्तानपासून बांगलादेशची मुक्तता करण्यात आणि बांगलादेश वायुदलाची स्थापना करण्यात भारतीय वायुदलाच्या डाकोटा विमानाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९७१ सालच्या युद्धात बांगलादेशच्या भूमीवर सैनिकांना उतरवण्यासाठी या विमानाचा वापर करण्यात आला होता.
ईस्टर्न एअर कमांडचे प्रमुख एअर मार्शल एस.बी. देव यांनी डाकोटा (डीसी ३) विमान आज बांगलादेश वायुदलाला औपचारिकरीत्या हस्तांतरित केले, असे भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले. ‘डाकोटा’चे सुटे भाग नवी दिल्ली येथून बांगलादेशात आणल्यानंतर हे विमान तेजगाव शहरात स्थापन करण्यात आले आहे.
भारताने १९७१ सालच्या युद्धादरम्यान दिलेल्या डाकोटासह तीन विमानांसह बांगलादेश वायुदलाची सुरुवात झाली होती. मुळात प्रवासी विमान असलेल्या ‘डाकोटा’चे लढाऊ विमानात रूपांतर करून त्याचा बांगलादेशातील तंगैल येथे सैनिकांना उतरवण्यासाठी (पॅराट्रपिंग) वापर करण्यात आला होता.