भारतातील लोकसंख्या आणि त्या तुलनेत देशातील डॉक्टरांची असणारी कमतरता याविषयी कायमच चर्चा होताना दिसते. याबाबत नुकतीच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एक लाख जणांमागे भारतात २ हून कमी भूलतज्ज्ञ उपलब्ध असल्याचे नुकतेच एका अहवालातून समोर आले आहे. तर जगभरात हे प्रमाण एक लाखामागे ५ इतके असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ सोसायटिज ऑफ अॅनास्थॉलॉजिस्ट’ या संघटनेनी नुकताच जगभरातील भूलतज्ज्ञांच्या आकडेवारीचा अभ्यास केला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जगभरातील ५ अब्ज लोकांना कोणतीही शस्त्रक्रिया करायची असल्यास त्यांना सुरक्षित आणि परवडेल अशी भूल देण्याची सुविधा उपलब्ध होत नसल्याचेही या अहवालात नमूद कऱण्यात आले आहे.

संघटनेच्या अहवालानुसार, आरोग्य सुविधा घेताना अनेकदा रुग्णाला आपल्या अर्थिक क्षमतांनुसार उपचार घ्यावे लागतात. ज्या देशांमध्ये ७ अब्जहून जास्त लोकसंख्या आहे. त्याठिकाणी श्रीमंत-गरीब दरी मोठ्या प्रमाणात भेडसावते. त्यामुळे उपचारांच्या गुणवत्तेत फरक होतो. आफ्रिका, मध्य आशिया, दक्षिण अमेरिका या देशांमध्ये एक लाखांमागे ६ भूलतज्ज्ञ असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

जगभरातील भूलतज्ज्ञांच्या प्रमाणाबाबत संघटनेचे कार्यकारी अधिकारी ज्यूलियन म्हणाले, उच्च उत्पन्न श्रेणी असणाऱ्या देशांमध्ये भूलतज्ज्ञांचे प्रमाण एक लाखांमागे २० इतके असून, भूल दिल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अतिशय कमी आहे. मात्र कमी उत्त्पन्न असणाऱ्या देशांमध्ये भूलतज्ज्ञांचे प्रमाण कमी असून, यातील चुकांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.

एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, सात लाख लोकांपैकी पाच लाख लोकांना गरजेवेळी सुरक्षित, परवडणारी आणि शस्त्रक्रियेदरम्यान घेण्यात येणारी शुश्रुषा मिळत नाही. ही सुविधा जास्तीत जास्त लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावी यासाठी भूलतज्ज्ञांना योग्य प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भरीव गुंतवणुकीचीही आवश्यकता असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे.