वीज ही माणसाची गरज आहे, मात्र वाढत्या लोकसंख्येबरोबर ऊर्जानिर्मिती होत नसल्याने नेहमीच ऊर्जेचा तुटवडा जाणवतो. याला पर्याय आहे सौरऊर्जा! सूर्य हा ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत असून, सौरऊर्जेचा वापर केला तर जागतिक ऊर्जेची भूक भागवली जाऊ शकते. सौरऊर्जेचे महत्त्व भारताने जाणले असल्याने देशात सौरऊर्जा तंत्रज्ञान क्षमता असल्याचे एका अमेरिकी संस्थेने म्हटले आहे.
सौरऊर्जेसंदर्भात संशोधन आणि जनजागृती करण्याचे काम ही संस्था करते. सौरऊर्जा तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या देशांची यादीच या संस्थेने केली असून, भारत यात चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिया यादीत अव्वल स्थानावर आहे. अमेरिके सौरऊर्जेची सर्वाधिक निर्मिती होत असून, तिचा वापरही मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. स्पेन दुसऱ्या तर अबूधाबी तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि स्पेनमध्ये केंद्रित सौरऊर्जा तंत्रज्ञानाने बाजारपेठा काबीज केल्या असून, या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूकही केली जात आहे. जगातील सौरऊर्जेची क्षमता २००४पासून दसपटींनी वाढली असून, गेल्या वर्षी तब्बल ३.४ गिगावॉट सौरऊर्जेची निर्मिती करण्यात आलेली आहे. अबूधाबीमध्ये असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पात १०० मेगावॉट वीज तयार होत असल्याची माहिती या संस्थेच्या अहवालात आहे.