देशात करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता दररोज सुमारे ९० हजार रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे सरकार सातत्याने करोनासंबंधित नियमांमध्ये सूट देत आहे. दरम्यान, लोकांना देश लवकरच हर्ट इम्युनिटीजवळ जाईल असं वाटतंय, मात्र असं नाहीए. कारण, आपण अद्याप हर्ड इम्युनिटीपासून दूर आहोत असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. तसंच करोनापासून संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगण्याचे आवाहनही त्यांनी लोकांना केलं आहे. ‘संडे संवाद’ या सोशल मीडियावरील चर्चेदरम्यान ते लोकांशी बोलत होते.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “कोविड-१९साठी हर्ट इम्युनिटी मिळवण्यापासून भारत अद्याप फार दूर आहे, असं आयसीएमआरच्या दुसऱ्या सिरो सर्वेक्षणातून समोर आलं आहे. त्यामुळे लोकांनी करोनापासून वाचण्यासाठी सर्व उपाययोजना करायला हव्यात. त्यांच्या मते रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा थेरपीला प्रोत्साहित करायचे नाही. याबाबत सरकारने रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत.”

“करोना विषाणूच्या दुसऱ्यांदा संक्रमणाबाबत सविस्तर शोध घेतला जात आहे. आजपर्यंत याचे नगण्य प्रकरणं समोर आली आहेत. सरकार याबाबत पूर्णपणे लक्ष देऊन आहे. त्याचबरोबर आयसीएमआरची टीम देखील यावर काम करीत आहे,” असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

देशात किती रुग्ण करोनाबाधित?

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत ८८,६०० करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ११२४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर देशात करोनाचा आकडा ५९,९२,५३३ च्या पार गेला आहे. ज्यामध्ये ९४,५०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४९,४१,६२८ लोक बरे झाले आहेत. त्यामुळे देशात आता अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९,५६,४०१ आहे.