भारत आणि जपान सध्या करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. पण भविष्यात हे दोन्ही देश चंद्र मोहिमेसाठी एकत्र येणार आहेत. दोन्ही देशांनी एकत्र येऊन चंद्रयान मोहिमेची योजना आखली आहे. या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे. जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.

मागच्यावर्षी चांद्रयान-२ मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते. विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे. भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम २०२३ नंतर पार पडणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. २०२२ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. लँडिंग मॉडयुल आणि रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच ३ रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल. सर्वप्रथम २०१७ साली या मिशनबद्दल जाहीरपणे विचार व्यक्त करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी २०१८ मध्ये जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी सुद्धा यावर चर्चा झाली.