रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग हे औषध करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी ठरत आहे. अमेरिकेत १०६३ रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली. त्यात रेमडेसिविर औषध प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा दिसून आली. शिवाय हे औषध करोना व्हायरसला ब्लॉक करते. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणाऱ्या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रेमडेसिवीर औषधांचा वापर करण्यात आलेल्या करोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे अढळून आलं आहे, असं फॉउसी यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकन एफडीएकडून लवकरच करोना रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिविर औषधाच्या वापराला परवानगी देण्यात येईल.
अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस या कंपनीने रेमडेसिविर हे अँटीव्हायरल ड्रग बनवले होते. इबोला विषाणू विरोधातील चाचण्यांमध्ये हे औषध प्रभावहीन ठरले. पण चीनच्या वुहान शहरात करोनाच्या काही रुग्णांवर रेमडेसिविर हे औषध वापरण्यात आले. त्यावेळी काही प्रमाणात रुग्णांना या औषधाचा फायदा झाल्याचे दिसून आले. याच वुहान शहरातून करोना व्हायरसची साथ जगभरात पसरली.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि आयसीएमआरचे माजी महासंचालक डॉ. निर्मल के. गांगुली यांनी रेमडेसिविरच्या या औषधाच्या निष्कर्षांचा अभ्यास केला आहे. गिलीयड सायन्सेस आता करोनाच्या आणखी रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेणार आहे. सात देशातील ५,६०० रुग्णांवर रेमडेसिविरच्या चाचण्या घेण्यात येतील. या मध्ये भारताचा समावेश नाही.
कॅलिफोर्नियात स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये प्राध्यापक असणाऱ्या डॉक्टर अरुणा सुब्रमनियन यांनी या औषधाची छोटी चाचणी करुन बघितली. ५० टक्के रुग्णांना पाच एमजी औषध देण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत १० दिवसात सुधारणा झाली आणि ६०.६ टक्के रुग्णांना १४ दिवसात डिस्चार्ज मिळाला.
“रेमडेसिविर करोना विषाणूच्या निर्मितीला अटकाव करतो, त्यामुळे संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे औषध Covid-19 च्या उपचारांमध्ये प्रभावी ठरु शकते” असे आयसीएमआरचे रमन आर गंगाखेडकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. भारतात सध्या हे औषध उपलब्ध नाहीय. आपल्या देशातील नागरिकांना हे औषध उपलब्ध करुन देण्यासाठी भारताने वेगवेगळया पर्यायांचा विचार केला पाहिजे असे निर्मल गांगुली यांनी म्हटले आहे.