भारताला नरेंद्र मोदींसारख्या निर्णयक्षम आणि सुजाण नेत्याची गरज आहे कुमारस्वामींसारख्या ट्रॅजिडी किंगची नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री अरूण जेटलींनी कुमार स्वामींवर निशाणा साधला आहे. कर्नाटकच्या आघाडी सरकारमध्ये मी विष पचवतो आहे असे म्हणताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना रडू कोसळले. त्यांचा हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी कुमारस्वामींना ट्रॅजेडी किंग म्हणत त्यांच्यावर टीका केली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये खरेतर भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र भाजपाला बहुमताची जुळवाजुळव करता आली नाही. तसेच काँग्रेस आणि जेडीएस या दोन पक्षांनी एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र अवघ्या काही महिन्यातच काँग्रेसशी आघाडी करून आपण भगवान शंकराप्रमाणे हलाहल अर्थात विष पचवत आहोत असे कुमारस्वामींना म्हणण्याची वेळ आली. त्यावरच निशाणा साधत अरूण जेटलींनी कुमारस्वामींना ट्रॅजेडी किंग म्हटले आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने कुमारस्वामींसोबत तेच केले जे आत्तापर्यंत चरण सिंग, चंद्रशेखर, एच. डी. देवेगौडा आणि आय. के गुजराल यांच्यासोबत केले, असेही जेटली यांनी म्हटले आहे. मुळात जेडीएस आणि काँग्रेसने जे काही कर्नाटकत केले तेच आदर्शवादाला धरून नाही. अशी आघाडी करणे हा जर कुमारस्वामींना विषाचा प्याला वाटत असेल तर त्यांच्यासारखा माणूस हा बिचाराच ठरतो. जगात सर्वाधिक वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थेचे म्हणजेच भारताचे नेतृत्त्व त्यांच्यासारखा ट्रॅजेडी किंग करू शकत नाही. व्होट बँकेचे राजकारण करणारे पक्ष देशाचे काय नेतृत्त्व करणार असाही प्रश्न जेटली यांनी उपस्थित केला. यूपीए टूच्या धोरण लकव्याचाही उल्लेख जेटली यांनी यावेळी केला.