जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानं अनेक स्तरांवर भारतविरोधी प्रचार केला होता. परंतु प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानला तोंडावरच पडावं लागलं होतं. पाकिस्ताननं यावेळी संयुक्त राष्ट्रांची संस्था युनेस्कोमध्ये अयोध्येतील राम जन्मभूमीच्या निकालाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पाकिस्तानच्या डीएनएमध्येच दहशतवाद असल्याचं म्हणत भारतानं पाकिस्तानवर हल्लोबोल केला. भारतानं पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर उत्तर देत पाकिस्तान भारताच्या अखंडतेत आणि अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं.

काही दिवसांपूर्वी अयोध्येतील राम जन्मभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. पाकिस्ताननं यावेळी युनेस्कोमध्ये काश्मीरसोबतच अयोध्येतील राम जन्मभूमीचा मुद्दाही उपस्थित केला. अनन्या अग्रवाल यांनी भारताची बाजू मांडत पाकिस्तानवर हल्लाबोल केला. १९४७ मध्ये पाकिस्तानमध्ये २३ टक्के अल्पसंख्याक होते. परंतु आता केवळ ३ टक्के अल्पसंख्याक राहिले आहेत. पाकिस्तानमध्ये ख्रिस्ती, शीख, हिंदू, शिया आणि अहमदिया मुस्लिमांसाठी वेगळे कायदे आहेत. तसंच त्यांच्या धर्मांतराचे प्रयत्नही केले जात असल्याचं त्या म्हणाल्या.

आज पाकिस्तामध्ये बालविवाह, महिलांवरील हिंसाचार आणि ऑनर किलिंग ही मोठी समस्या बनली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मंचाचा वापर पाकिस्तानकडून अणू हल्ल्याची धमकी देण्यासाठी केला जातो. ओसामा बिन लादेन आणि हक्कानीच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी हिरो म्हटलं होतं. पाकिस्तानमध्ये दहशतादाची मूळ रोवली आहेत, असंही त्यांनी सांगितलं. कोणत्याही देशाच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे त्या देशाच्या सार्वभौमत्वाचा अपमान असल्याचं त्या म्हणाल्या.