दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी लिहिलेले एक पत्र वादात सापडले आहे. देशातील धर्मनिरपेक्षता धोक्यात असून देशासाठी प्रार्थना करा असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. दिल्लीतील ख्रिश्चन धर्मगुरुंना लिहिलेल्या या पत्रात प्रार्थना सभा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी उपवास ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सध्या देशातील खवळलेल्या राजकीय वातावरणामुळे संविधानातील लोकशाही तत्व आणि धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाला आहे. देशासाठी आणि राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करणे आपली पवित्र प्रथा आहे. पण सार्वत्रिक निवडणूक जवळ येत असताना अशी प्रार्थना करणे जास्त महत्वाचे आहे. २०१९ मध्ये आपल्या देशात नवीन सरकार असेल त्यामुळे आतापासूनच प्रार्थना मोहिम सुरु करुया असे आर्चबिशप यांच्या पत्रात म्हटले आहे.

यासंबंधी आर्चबिशप यांचे सचिव फादर रॉबिनसन रॉड्रीग्ज यांना विचारले असता ते म्हणाले कि, प्रत्येक लोकसभा निवडणुआधी अशा प्रार्थनसभा आयोजित केल्या जातात. पण यावेळी या पत्रावरुन राजकारण केले जात आहे. निवडणूका शांत, निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पार पाडव्यात यासाठी प्रार्थना आयोजित केली जाते. २०१४ लोकसभा निवडणूक आणि त्याआधी सुद्धा अशा प्रार्थना झाल्या आहेत असे फादर रॉड्रीग्ज यांनी सांगितले.