‘जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या वैमानिकाला पाकिस्तान सोडत नाही तोपर्यंत त्यांच्याशी भारताने कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा बोलणी करु नयेत’, अशी मागणी निवृत्त ग्रुप कॅप्टन दिलीप पारुळकर यांनी केली आहे. 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या युद्धामध्ये पारुळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर 1972 मध्ये युद्धकैदी असताना ते चकमा देऊन पाकिस्तानातून सुखरुप पळून आले होते.

10 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारताचं सुखोई-7 फायटर जेट पाडलं, त्यानंतर पारुळकर यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. पाकिस्तानच्या रावळपिंडीमधील युद्धकैद्यांच्या शिबीरात त्यांना ठेवलं असाताना 1972 मध्ये पारुळकर, विंग कमांडर एम.एस.ग्रेवाल (Wing Commander M S Grewal), ग्रुप कॅप्टन हरिष सिंझी(Group Captain Harish Sinhji) आणि अन्य काही भारतीय वैमानिकांनी त्या शिबीरातून पाकिस्तान सैन्याला चकमा देत पळ काढला.

‘जर तुम्ही पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागलात किंवा त्यांनी तुम्हाला ताब्यात घेतलं आणि युद्धकैदी बनवलं तर तुम्हाला तेथून पळून यायचं’ असं आमच्या वरिष्ठांनी सांगितलं होतं, आणि मी त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेतलं, असं सांगत पारुळकर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्या आठवणी ताज्या केल्या.

‘जेव्हा मला पाकिस्तानने पकडलं होतं, तो माझ्या कुटुंबियांसाठी अत्यंत कठिण काळ होता. पण भारतीय सैनिकांच्या पराक्रमामागे सातत्याने त्यांच्या कणखर कुटुंबियांचा पाठिंबा असतो हे कुणीही विसरु नये…आणि अशा परिस्थितीत देशाने कठोर भूमिका घेणं गरजेचं असतं. पूर्वीच्या अशाच काही घटनांमध्ये इस्त्राइलने कशाप्रकारे उत्तर दिलं होतं याचं मी नेहमी उदाहरण देतो. त्यांच्याप्रमाणेच भारतानेही कठोर भूमिका घ्यायला हवी आणि जोपर्यंत ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला पाकिस्तान सुखरुपरित्या सोडत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची बोलणी करु नयेत’, अशी मागणी पारुळकर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना केली.

भारतीय हद्दीत बुधवारी सकाळी घुसून हल्ला करू पाहणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना भारताने चोख उत्तर देत पिटाळून लावले आणि पाकिस्तानचे एफ-16 विमान त्यांच्याच हद्दीत पाडले. त्यानंतर, अन्य पाकिस्तानी विमाने निघून गेली. मात्र, पाकिस्तानचे विमान पाडताना मिग-21 हे विमान भारताने गमावले असून, त्याचा वैमानिक बेपत्ता असल्याचे भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. त्यानंतर, त्याच्या सुटकेची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली.