पूर्व लडाखमध्ये सीमारेषेवर भारताने चीनच्या आगळीकीला जे प्रत्युत्तर दिले, त्याचे अमेरिकेने कौतुक केले आहे. “अलीकडेच सीमावादात भारताने चीन विरोधात उभं राहून आपली इच्छाशक्ती आणि क्षमता दाखवून दिली” असे लिसा कर्टीस म्हणाल्या. त्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या दक्षिण मध्य आशियाच्या वरिष्ठ संचालक आहेत.

“पूर्व लडाखच्या सीमारेषेवर भारत-चीनमध्ये जे सुरु आहे, त्यावर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे लक्ष आहे. भारताने जो दृढ संकल्प दाखवला त्यातून या देशांना नक्कीच प्रेरणा मिळेल” असे लिसा कर्टीस म्हणाल्या. बुधवारी ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले.

चीनचा प्रादेशिक प्रभाव वाढतोय, त्यावर त्या बोलत होत्या. चायनीज अ‍ॅपवर बंदी आणि चिनी गुंतवणूक रोखून भारताने चीनला आर्थिक आघाडीवर दणका दिल्याच्या मुद्दाकडे त्यांनी लक्ष वेधले. “दोन्ही देशांमध्ये तणाव कमी होतोय ही चांगली गोष्ट आहे. पण नियंत्रण रेषेवर चीनने भारतावर जो दबाव आणला, त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत” असे त्या म्हणाल्या. “जगाच्या अन्य भागांमध्ये चीन ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवतो, लडाखमध्ये सुद्धा तोच पॅटर्न होता” असे त्यांनी सांगितले.

सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अपूर्णच!
पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे गुरुवारी भारताने स्पष्ट केले. मात्र सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली असल्याचे भारताने म्हटले आहे.

भारत आणि चीनने सीमेवरील बहुसंख्य ठिकाणांहून आपापले सैन्य पूर्णपणे मागे घेतल्याचा दावा चीनच्या राजदूतांनी गुरुवारी केला होता. त्यानंतर भारताने हे स्पष्टीकरण दिले आहे.

सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रगती झाली आहे, मात्र सैन्य पूर्णपणे मागे घेण्यात आलेले नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी मंगळवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी ऑनलाइन संवाद साधताना स्पष्ट केले होते. सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणती पावले उचलावीत या बाबत भारत आणि चीनचे लष्करी कमांडर नजीकच्या भविष्यात चर्चा करणार आहेत, असेही प्रवक्त्याने सांगितले.