स्वदेशी बनावटीच्या निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी भारताने यशस्वी रीत्या घेतली असून हे क्षेपणास्त्र तीनशे किलो अस्त्रे वाहून नेऊ शकते. ओदिशातील चंडीपूर किनाऱ्यावर ही चाचणी करण्यात आली. २०१४ पासून घेतलेल्या चार चाचण्यांत केवळ एक चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आताची चाचणी यशस्वी झाली ही आनंदाची बाब असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्रातील संकुल क्रमांक ३ मधून हे क्षेपणास्त्र आकाशात झेपावले. सकाळी ११.२० वाजता ही चाचणी करण्यात आली, असे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने म्हटले आहे. आधीचे सोपस्कार पार पडल्यानंतर हे उड्डाण यशस्वी झाले. आता या उड्डाणाची तांत्रिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून या क्षेपणास्त्राचे रॉकेट बूस्टर अ‍ॅडव्हान्सड सिस्टीम लॅबोरेटरी यांनी तयार केले आहे.

या क्षेपणास्त्राचा पल्ला १००० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र टबरेफॅन व टबरेजेट इंजिनसह चालते. त्यातील दिशादर्शक प्रणाली स्वदेशी असून ती आरसीआयने तयार केली आहे. या क्षेपणास्त्राने अपेक्षित वेग व उंची गाठली होती व त्याचा मार्गही योग्य होता, असे सांगण्यात आले. रडार व विमानांच्या मदतीने त्याचे निरीक्षण करण्यात आले.

या क्षेपणास्त्रात काही बदल करण्यात आले होते व आता त्याची चाचणी यशस्वी झाली आहे. त्याची पहिली चाचणी १३ मार्च २०१३ रोजी झाली.

ती मध्यावरच तांत्रिक कारणास्तव थांबवावी लागली नंतर १७ मार्च २०१४ रोजी दुसरी चाचणी यशस्वी झाली. १६ ऑक्टोबर २०१५ रोजी तिसरी चाचणी १२८ कि.मी. अंतर कापल्यानंतर फसली. तर २१ डिसेंबर २०१६ मध्ये उड्डाण ७०० सेकंद आधी रद्द करावे लागले होते कारण ते क्षेपणास्त्र भरकटण्याचा धोका होता. या सर्व चाचण्या चंडीपूर येथे झाल्या होत्या.

दोन टप्पे

* उंची ६ मीटर

* रुंदी ०.५२ मीटर

* पंख २.७ मीटर

* अस्त्रवहन क्षमता २०० ते ३००किलो

* वजन १५०० किलो

* वेग ०.६ ते ०.७ मॅक