पुढील वर्षापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. तसेच ही उभारी घेताना ब्रिटनलाही भारत मागे. तर, २०४० मध्ये भारताचा तीन विशाल अर्थव्यवस्थांमध्ये क्रमांक लागेल असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

जेटली म्हणाले, भारतात दरडोई उत्पन्न हे कमी राहिल मात्र अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड मोठा असल्याने ती वेगाने अधिक विकसित होत आहे. या वर्षी आकाराच्या रुपात आपण फ्रान्सला मागे टाकले आहे. पुढील वर्षी आपण ब्रिटनलाही मागे टाकू आणि जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेची नोंद होईल.

जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत खूपच धीम्या गतीने विकसित होत आहेत. त्यांची अर्थव्यवस्ता एक ते दीड टक्क्यांनी वाढत आहे. जर आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकास दरात सात ते आठ टक्क्यांनी वाढ होत असेल तर या अर्थव्यवस्थांना मागे टाकायला आपल्याला फार काळ लागणार नाही. जर आपण २०३० आणि २०४० च्या दृष्टीने पाहत असाल तर नक्कीच आपली अर्थव्यवस्था जगातील आकाराने तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल. १०-२० वर्षांत बदल घडवून आणण्याइतकी भारतामध्ये नक्कीच क्षमता आहे.

उदाहरण सांगायचे झाल्यास देशाच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात अधिक विकास झाला आहे. या तुलनेत आता पूर्व भागातील राज्यांना आपल्या विकासाचा वेग वाढवावा लागेल. आपली लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार आणि त्याची क्षमता प्रचंड बनली आहे. त्यामुळेच बाजाराचेही रुप प्रचंड आहे. त्यामुळे आपण निश्चितपणे असाधारण बनू त्यासाठी आपल्याला आवश्यक पावले उपलण्याची आवश्यकता आहे.