येत्या २६-२७ ऑक्टोबर दरम्यान भारत आणि अमेरिकेत तिसरी टू प्लस टू चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी सरकार भू-स्थानिक सहकार्यासाठी BECA करारावर स्वाक्षरी करु शकते. अमेरिकेकडून MQ-9B हे सशस्त्र ड्रोन विकत घेण्यासाठी बीईसीए करार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शत्रूच्या प्रदेशातील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करण्यासाठी ही अमेरिकन ड्रोन विमाने भू-स्थानिक डाटाचा वापर करतात. BECA करारामुळे भारताला अमेरिकेचे भू-स्थानिक नकाशे वापरण्याची मुभा मिळणार आहे.

याच आठवडयात मंत्री स्तरावरील चर्चेतून भारत-अमेरिकेतील संवादाचा विस्तार होणार आहे. येत्या सहा ऑक्टोबर रोजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकन समकक्ष माइक पॉम्पियो यांची टोक्योत भेट घेतील. ऑक्टोंबरच्या अखेरीस अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क इस्पर आणि राजनाथ सिंह दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत टू प्लस टू चर्चेत सहभागी होतील. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

टू प्लस टू बैठकीत BECA करारावर स्वाक्षरी होणे, सर्वात महत्त्वपूर्ण घडामोड असेल. या करारामुळे क्रूझ आणि बॅलेस्टिक मिसाइलद्वारे अचूकतेने हल्ला करण्यासाठी भारताला अमेरिकेच्या भू-स्थानिक नकाशांचा वापर करता येणार आहे. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये झालेल्या तिन्ही करारांची अमलबजावणी सुरु झाली आहे. दोन्ही देश इंधन भरण्यासाठी परस्परांच्या लष्करी तळांचा वापर करतात, हा त्याच करारांचा भाग आहे. टू प्लस टू बैठकी दरम्यान अमेरिकेचे दोन्ही मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतील.