सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि त्या दहशतवादापासून जगाला असलेल्या धोक्याचा केंद्रबिंदू कोठे आहे आदी मुद्दे भारत सातत्याने जागतिक स्तरावर ठामपणे मांडत राहील, असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास गुरुवारी १२ वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने भारताने पाकिस्तानचा संदर्भ देत वरील बाब स्पष्ट केली.

भारतातील सुरक्षा दले ज्या धैर्याने देशाचे रक्षण करीत आहेत त्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी कौतुक केले. सीमेपलीकडून भारताविरुद्ध होणाऱ्या दहशतवादी कारवाया भारत सातत्याने जागतिक स्तरावर मांडत राहील, असे जयशंकर यांनी ट्वीट केले आहे.

जयशंकर हे बाहरिन, संयुक्त अरब अमिरात आणि सेशल्स या तीन देशांच्या दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांचे येथे आगमन झाले. करोनाने जगभरात थैमान घातले असताना जयशंकर दौऱ्यावर आले आहेत त्यामुळे त्याला महत्त्व आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.