उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देशाला आता नव्या पंतप्रधानांची गरज आहे असे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांनंतर राहुल गांधी पंतप्रधान होतील असे वाटते का? असा प्रश्न अखिलेश यादव यांना विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना अखिलेश यादव यांनी ही बाब नमूद केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता अखिलेश यादव यांनी ही टीका केली. देशाला नव्या सरकारची आणि पंतप्रधानांची गरज आहे आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकानंतर देशाचा पंतप्रधान बदललेला असेल असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

आगामी काळात लोकसभा निवडणुका पार पडतील तेव्हा राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून पाहता की स्वतःला पंतप्रधानपदी पाहता? असा प्रश्न अखिलेश यादव यांना पत्रकारांनी विचारला. त्यानंतर लगेच देशाच्या जनतेलाच नवा पंतप्रधान आणि नवे सरकार हवे आहे. लोकसभा निवडणुकानंतर जेव्हा तुम्ही निकाल पाहाल तेव्हा तुम्हाला देशाला नवा पंतप्रधान मिळाल्याचे दिसून येईल असेही अखिलेश यादव यांनी म्हटले. आता अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यावर भाजपाकडून काही प्रतिक्रिया दिली जाते का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उत्तर प्रदेशातील चार ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने सपा आणि बसपाला साथ दिली. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांसाठी काय समीकरणे असू शकतात? असा प्रश्नही यादव यांना विचारण्यात आला ज्यावर तूर्तास काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. आम्ही तिसऱ्या आघाडीचा विचार करतो आहोत. सद्यस्थितीत भाजपाने ४७ पक्षांसोबत हातमिळवणी केली आहे. जे भाजपा करू शकते ते आम्हीही करू शकतो असेही यादव यांनी स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांबद्दल जेव्हा विचारण्यात आले तेव्हा अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की आम्ही विकासाच्या आधारे लोकांची मते मागितली. तर भाजपाने जात आणि धर्म पुढे करून प्रचार केला होता. भाजपा जात आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत अशीही टीका यादव यांनी केली. तसेच देशाला आता नव्या पंतप्रधानांची गरज आहे असेही मत त्यांनी मांडले.