भारताच्या हवाईदलाचे सामर्थ्य आणखी वाढले आहे. ‘स्पाइस २००० बॉम्ब’ इस्रायलने भारतीय हवाईदलाला सुपूर्द करण्यास सुरुवात केली आहे. अत्याधुनिक अशा ‘बिल्डींग ब्लास्टर’ प्रकारातील हे बॉम्ब आहेत. भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे केलेल्या हवाईहल्ल्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॉम्बचे हे अत्याधुनिक रुप आहे. भारत पाकिस्तानमध्ये वाढता तणाव पाहता या बॉम्बमुळे भारतीय हवाईदलाची शक्ती अनेक पटींने वाढणार आहे. तर हे बॉम्ब भारताकडे आल्याने काश्मीर मुद्द्यावर सतत भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तानची चिंता नक्की वाढणार आहे.

इस्रायलमधील ‘मार्क ८४’ या कंपनीबरोबर भारताने २५० कोटींचा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारतीय हवाईदल अत्याधुनिक बॉम्ब विकत घेणार आहे. याच ‘स्पाइस २००० बॉम्ब’ची पहिली तुकडी नुकतीच भारताला ग्वाल्हेर येथील हवाईदलाच्या तळावर सुपूर्द करण्यात आली. हे बॉम्ब केवळ मिराज २००० या लडाऊ विमानांमध्ये वापरता येणार आहेत. हे बॉम्ब इतके शक्तीशाली आहेत की ते संपूर्ण इमारत अगदी काही क्षणांमध्ये उद्धवस्त करु शकतात. म्हणूनच त्यांना ‘बिल्डींग ब्लास्टर’ असे नाव देण्यात आले आहे.

मार्क ८४ या इस्रायलमधील कंपनीबरोबर जून महिन्यात झालेल्या करारानुसार भारत १०० ‘स्पाइस २००० बॉम्ब’ विकत घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संरक्षण खात्यासाठी तत्काळ खरेदी करण्याच्या उद्देशाने जारी केलेल्या अतिरिक्त निधीमधून हा करार झाल्याचे समजते. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यांमध्ये इस्रायलमधील निर्मिती असणाऱ्या ‘स्पाइस २००० बॉम्ब’चा यशस्वीपणे वापर करण्यात आला. आता याच बॉम्बच्या तंत्रज्ञानामध्ये बदल करुन तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वरुपाचे बॉम्ब भारताने खरेदी केले आहेत. बालाकोट हवाई हल्ल्यामध्ये भारताने जैश-ए-मोहम्मदच्या तळावर मिराज २००० विमानांमधून ‘स्पाइस २००० बॉम्ब’ प्रकारातील १२ बॉम्ब फेकले होते.