भारतीय अमेरिकी विद्यार्थिनीला तिने १९८४ मधील भोपाळ वायू दुर्घटनेच्या परिणामांमुळे प्रेरित होऊन केलेल्या संशोधनास प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. सोही संजय पटेल असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती टेक्सास हायस्कूलमध्ये शिकते. तिला ‘पॅट्रिक एच हर्ड शाश्वतता पुरस्कार २०२१’ जाहीर झाला आहे.

रिजेनेरॉनच्या आंतरराष्ट्रीय आभासी विज्ञान व तंत्रज्ञान मेळ्यात तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. तिचा प्रकल्प हा वनस्पतींच्या मदतीने पॉलियुरेथिनसारखा फोम तयार करण्याबाबत असून त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. घरबांधणीतही या फोमचा वापर करता येतो. पटेल हिच्या या संशोधन प्रकल्पास १९८४ मधील भोपाळ वायू दुर्घटनेची पार्श्वभूमी असून त्या वेळी ४० टन मेथिल आयसोसायनेट वायू कीटकनाशक प्रकल्पातून बाहेर पडला होता. मेथिल आयसोसायनेट हा वायू पॉलियुरेथिन फोम तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो.

सोही हिच्या संशोधन प्रकल्पाचे नाव ‘स्केलेबल अँड सस्टेनेबल सिंथेसिस ऑफ नॉव्हेल बायोबेस्ड पॉलियुरेथिन फोम सिस्टीम’ असे असून त्यात पर्यावरणस्नेही पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. तिने दोन बिनविषारी उत्पादने टाकाऊ कचऱ्यापासून तयार केली आहेत, त्यापासून पॉलियुरेथिन तयार करता येते. पर्यावरण विज्ञान संस्थेच्या सल्लागार डॉ. जेनिफर ऑर्मी झॅवॅलेटा यांनी सांगितले, की यंदाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मेळ्यात जे प्रकल्प सादर करण्यात आले ते पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त आहेत. ‘सोसायटी फॉर सायन्स अँड पब्लिशर ऑफ सायन्स न्यूज’ या संस्थेच्या माया अजमेरा यांनी सोही संजय पटेल हिच्या प्रकल्पाचे कौतुक केले आहे.